MK Stalin । Narendra Modi : ‘नरेंद्र मोदी मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर ‘पंतप्रधान’ झाले’ – स्टॅलिन

MK Stalin । Narendra Modi – पंतप्रधान नरेंद्र मोदी मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर पुन्हा त्या पदावर विराजमान झाले आहेत. केंद्रातील सरकार स्थापनेसाठी मित्रपक्षांवर विसंबून रहावे लागणे हा खरेतर मोदींचा पराभव आहे, असे भाष्य तामीळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांनी केले.
देशभरातील विरोधी पक्षांचा समावेश असणाऱ्या इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीत लक्षणीय कामगिरी केली. त्या आघाडीत समावेश असणाऱ्या द्रमुक, कॉंग्रेस आणि मित्रपक्षांनी तामीळनाडूत एकहाती वर्चस्व मिळवले. त्या राज्यातील लोकसभेच्या सर्व ३९ जागा इंडियाने पटकावल्या.
तामीळनाडूतील तो विजय साजरा करण्यासाठी आयोजित विशेष कार्यक्रमात स्टॅलिन बोलत होते. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पाठिंब्यामुळे मोदी पुन्हा पंतप्रधान बनले आहेत. भाजपच्या बळावर ते पंतप्रधान बनलेले नाहीत. आता त्यांचे सरकार भाजपला हवे ते सर्व करू शकणार नाही, अशी शाब्दिक टोलेबाजी त्यांनी केली.
इंडिया आघाडीची कामगिरी ऐतिहासिक स्वरूपाची असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलेल्या योगदानाचाही आवर्जून उल्लेख केला. प्रचारासाठी मोदींनी तामीळनाडूचे अनेक दौरे केले. मात्र, राहुल यांचा प्रचार अधिक प्रभावी ठरला, असे स्टॅलिन यांनी याआधीही नमूद केले होते.





