Narendra Modi : काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई होणार; मोदींनी दिला इशारा
गॅस सिलिंडरवरून निर्माण झालेल्या कथित पेचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी महत्वाचे भाष्य केले. देशाची ऊर्जा सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

Narendra Modi : गॅस सिलिंडरवरून निर्माण झालेल्या कथित पेचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुरूवारी महत्वाचे भाष्य केले. देशाची ऊर्जा सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
तसेच, काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई होईल, असा इशाराही दिला.एनएक्सटी शिखर परिषदेत बोलताना मोदींनी (Narendra Modi) पश्चिम आशियातील युद्धामुळे संपूर्ण जगात निर्माण झालेल्या स्थितीकडे लक्ष वेधले.
त्या संघर्षामुळे उद्भवलेल्या स्थितीपासून कुठलाच देश अस्पर्शित राहिलेला नाही. राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे, युवक, शहरे आणि गावे यांसारख्या आणि इतर प्रत्येक घटकाला सध्याची स्थिती हाताळण्यासाठी महत्वाची भूमिका निभावावी लागेल, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. एलपीजीवरून काही लोक घबराट पसवण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्यातून ते जनतेसमोर उघडे पडत आहेत. त्याशिवाय, ते देशाचेही नुकसान करत आहेत, अशी टिप्पणी त्यांनी केली. याआधी आपण करोना संकटाला सामोरे गेलो. त्याप्रमाणेच आताच्या स्थितीवरही आपण मात करू, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. संपूर्ण जग कठीण टप्प्यातून जात असताना भारत वेगाने पुढील वाटचाल करत आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.






