Narendra Dabholkar : नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील प्रमुख आरोपीला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेच्या निर्णयालाही…
Narendra Dabholkar : सचिन अंदुरेला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला

Narendra Dabholkar : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेला आरोपी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला आहे. तसेच अंदुरे याला न्यायालयाने सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हा आदेश न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने दिला आहे.
अंदुरे याने दोषी ठरवण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देत एका अंतरिम अर्जाद्वारे जामीन व जन्मठेपेची शिक्षा स्थगित करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने मंगळवारी त्याचा हा अर्ज मंजूर केला. महत्त्वाचे म्हणजे अंदुरे याच्यावर कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणीही खटला सुरू आहे, मात्र दोन्ही प्रकरणात त्याला जामीन मिळाल्यामुळे अंदुरे आता तुरुंगातून बाहेर येऊ शकतो.
दाभोलकरांची हल्लेखोरांकडून गोळ्या झाडून हत्या
डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात प्रभातफेरीला गेले असताना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून केला जात होता, परंतु त्यांची कन्या मुक्ता दाभोलकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनंतर २०१४ मध्ये प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आला.
ज्यानंतर पुण्यातील विशेष न्यायालयाने प्रमुख आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. अंदुरे हा गोळ्या झाडणाऱ्यांपैकी एक होता, असा दावा सरकारी पक्षाने केला होता. Narendra Dabholkar
या प्रकरणात दोघांना जन्मठेपेच्या शिक्षेसह प्रत्येकी ५ लाख रुपयांचा दंड सुनावण्यात आला होता. तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या तिघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. न्यायालयाला अंदुरे याच्याविरोधात दोष सिद्ध करण्याइतका पुरावा मिळाला नसल्याने जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वी शरद कळसकर याला उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे.
या निर्णयानंतर आता डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे चिरंजीव डॉ. हमीद दाभोलकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सचिन अंदुरेच्या जामिनाला विरोध करत, ‘अंदुरेला जामीन मिळाल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल,’ असे म्हटले आहे. Narendra Dabholkar
हेही वाचा:
Pune News : तणावमुक्त जीवनासाठी डॉ. बी. के. शक्तीराज यांचे व्याख्यान






