Narayangaon News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नारायणगावात ५० एकरवर सजणार ग्लोबल कृषी प्रदर्शन

प्रभात वृत्तसेवा
नारायणगाव – कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात येणार्या ग्लोबल कृषी प्रदर्शन 2026च्या तयारीला वेग आला असून, प्रदर्शनासाठी उभारण्यात येणार्या महामंडपाचे भूमिपूजन चेअरमन कृषिरत्न अनिल मेहेर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित खैरे, उपाध्यक्ष शशिकांत वाजगे, पदाधिकारी रवींद्र पारगावकर, प्रकाश पाटे, मोनिका मेहेर, डॉ. आनंद कुलकर्णी, सोमजीभाई पटेल, डॉ. संदीप डोळे, रत्नदीप भरवीरकर, अरविंद मेहेर,
देवेंद्र बनकर, ऋषीकेश मेहेर, निलेश पाटे, शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत शेटे, राहुल घाडगे, योगेश यादव, भरत टेमकर, डॉ. दत्तात्रय गावडे, धनेश पडवळ, वैभव शिंदे, निवेदिता शेटे, डॉ. सुयोग खोसे, रुपेश कोळेकर, नितीन होनराव, संतोष पर्हाड आदी मान्यवर उपस्थित होते. 8 ते 11 जानेवारी 2026 या कालावधीत हे ग्लोबल कृषी महोत्सव पार पडणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी कृषी सचिव विकास रस्तोगी, कृषी आयुक्त सुरज मांढरे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, एस. के. रॉय उपस्थित राहणार आहेत.प्रदर्शनात 250 स्टॉल, 18 कंपन्यांची पीक प्रात्यक्षिके, तसेच कृषी उत्पादनांवरील चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
धान्य महोत्सवात महिला बचत गट व महिला शेतकरी यांच्यासाठी 50 स्टॉल उपलब्ध असतील. महिलांनी उत्पादित केलेल्या मालासाठी ऑनलाईन खरेदी-विक्री सुविधा, एसएसआय मान्यता आणि क्यूआर कोड प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना उत्पादनाची संपूर्ण माहिती व पोषणमूल्ये समजण्यास मदत होईल, अशी माहिती कृषिरत्न अनिल मेहेर यांनी दिली.
ग्लोबल कृषी प्रदर्शनात युवक-युवतींपासून जेष्ठांपर्यंत शेतीपूरक व्यवसायांचे मार्गदर्शन, युवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. आयआयटीच्या माध्यमातून विकसित स्पेक्ट्रम डिव्हाईसद्वारे माती परीक्षण तात्काळ मिळणार असून, पिकांसाठी योग्य खत-मात्रा ठरविण्यास शेतकर्यांना लाभ होणार आहे. तसेच कोकोनट बोर्डसोबत सामंजस्य करार करण्यात आला असून कमी उंचीचा ड्रॉप नारळ विकसित करण्यात आला आहे.
जागतिक दर्जाचे कृषी प्रदर्शन – कृषिरत्न अनिल मेहेर
कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकर्यांसाठी जागतिक दर्जाचे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात 250 हून अधिक कंपन्या, 45 प्लॉट्स, 70 पीक प्रात्यक्षिके असतील. परसबागेत 45 प्रकारचे भाजीपाला, मिलेट उद्यानात 12 प्रकारचे मिलेट्स, धान्य महोत्सवात महिला शेतकरी व बचत गटांचा सहभाग असेल.
50 एकर क्षेत्रात शिवार फेरी, 10 गुंठ्यांत 40 प्रकारचा विषमुक्त भाजीपाला, तसेच पंचतारांकित हॉटेल्ससाठी चायनीज व विदेशी भाजीपाला यांचे प्रात्यक्षिक होणार आहे. नारायणगावच्या भूमीत एक लाखांहून अधिक शेतकरी सहभागी होऊन हा कृषी तंत्रज्ञानाचा महाकुंभ ठरेल. एआय तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती उद्योगाला नवी भरारी देण्याचा हा महत्त्वाचा टप्पा ठरेल.





