नवी दिल्ली : संपलेल्या माणसांवर मी बोलणार नाही. मला त्यांच्या कुठल्याच प्रश्नाला उत्तर द्यायचे नाही. संपलेल्या माणसांना मला संजीवनी द्यायची नाही.त्यांच्यात काय दम आहे, ते मी पाहिले आहे. ते ठाकरे यांची बाजू लावून धरतात की नाही, हे मला माहीत नाही. महाजन यांना कोण कशाला मारेल? त्यांना मारून कोण ३०२ अंगावर घेईल, असा टोला माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते नारायण राणे यांनी मनसे नेते प्रकाश महाजन यांना लगावला. त्यांनी दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर राणे म्हणाले की, मी त्यांना अनेक वर्ष ओळखत आहे. ते दोघे एकत्र येऊ द्या, त्यांना चांगले नांदू द्या, लोकांना बंधू प्रेम दाखवून द्या. ते दोघे एकत्र आले तरी राजकारणात काही फरक पडणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका समोर असल्याने त्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दुसरे काहीही नाही. याबाबत मी राज ठाकरे यांना काहीही सल्ला देऊ शकत नाही. ते परिपक्व राजकारणी आहेत. त्यांना सगळे समजते. दोघे भाऊ किती दिवस एकत्र राहतील, या प्रश्नावर नो कॉमेंट करत त्यावर पत्रकार विश्लेषण करतील, असे राणे यांनी सांगितले. दरम्यान, प्रकाश महाजन यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केल्यानंतर, नारायण राणे यांनी फेसबुकच्या माध्यमातून प्रकाश महाजन यांना धमकीवजा इशारा देणारी पोस्ट केली होती. यानंतर प्रकाश महाजन यांना अनेक धमकीचे फोन आले होते. आता प्रकाश महाजन यांनी थेट नारायण राणे यांना आव्हान देणारी भाषा केली आहे. त्यांनी नारायण राणे यांच्यावर अत्यंत बोचरी, जिव्हारी लागणारी टीका केली आहे. मी नारायण राणे नावाच्या राजकीय गुंडाविरुद्ध लढायला तयार आहे. नारायण राणे मी कणकवलीत येतो, करायला लावा उलट्या. मला लेचपेचा समजू नका. माझ्या नेत्यावर टीका करणार, मी काय तुमच्या मुलावर फुले उधळू का? असा सवाल प्रकाश महाजन यांनी केला आहे.