Narayan Rane Health : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हृदयाशी संबंधित उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर डॉक्टरांचे निरीक्षण आहे. अलीकडेच कोकण दौऱ्यावर असताना नारायण राणे यांनी एका सभेत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले होते. “आता आपण किती करणार, यालाही मर्यादा असतात,” असे सांगत त्यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिल्याची चर्चा झाली होती. याचवेळी त्यांनी आपली दोन्ही मुले कर्तृत्ववान असून त्यांच्या क्षेत्रात यशस्वी असल्याचे नमूद करत, “नांदा सौख्यभरे,” असा आशीर्वादही दिला होता. दरम्यान, स्थानिक नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या यशानंतर कणकवली येथे नारायण राणे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपण थकल्याची भावना व्यक्त केली होती, ज्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. सध्या नारायण राणे यांच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.