नांदेडमधील ‘हल्लाबोल’ मिरवणुकीत उसळली गर्दी

नांदेड : दसऱ्या निमित्त काढलेल्या पारंपरिक ‘हल्लाबोल’ मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांवर वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप शिवले याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. हल्लाबोल मिरवणुकीसाठी उच्च न्यायालयाने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करावा, असे आदेश दिले होते, मात्र यावेळी मोठी गर्दी जमल्याचे उघड झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेल्या नियमांची नांदेड गुरुद्वारा कमिटीकडून पायमल्ली करण्यात आली आहे.
दसऱ्यानिमित्त काढण्यात आलेल्या ‘हल्लाबोल’ मिरवणुकीत प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबई उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या सूचनांचे गुरुद्वारा कमिटीकडून उल्लंघन करण्यात आले. कोरोनाचे सगळे नियम नांदेड गुरुद्वारा कमिटीनं धाब्यावर बसवले आहेत. नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा कमिटीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दसऱ्यानिमित्त दरवर्षी हल्लाबोल मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. पण यंदा कोरोनाच्या संकटामुळे काही ठरावीक लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.





