मुंबई : एकीकडे कॉंग्रेस संघटनात्मक पातळीवर संघर्ष करीत असताना दुसरीकडे पक्ष मजबूत करण्यासाठी विविध फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. यातच महाराष्ट्रात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर हायकमांडने अंतिम शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त होते. त्यानुसार घोषणा होणार होती. मात्र पटोले यांच्या नव्या मागणीमुळे ही घोषणा लांबणीवर पडली आहे.
विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यास काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवला आहे. परंतु पटोले यांनी ऐनवेळी अध्यक्षपदासोबतच मंत्रीपद देण्याची मागणी केल्याने पक्षाकडून प्रदेशाध्यक्षाची घोषणा रखडल्याची माहिती आहे.
दोन आठवड्यांपासून कॉंग्रेसमध्ये ही अंतर्गत बदलाची प्रक्रिया सुरु आहे. त्यात नाना पटोले यांचं नाव निश्चित झाले. त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभेचा नवा अध्यक्ष देखील बदलावा लागणार हे उघड होते. मात्र पटोले यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद हवे असल्याचे पक्षाला कळवले. अचानक आलेल्या या मागणीने पक्षश्रेष्ठी बुचकाळ्यात पडले असून प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची घोषणा प्रलंबित ठेवण्यात आली आल्याचे सूत्रांनी सांगितले.
याआधी विजय वडेट्टीवार आणि राजीव सातव यांची नावे देखील प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत होती. तर विजय वडेट्टीवार यांच्यासाठी स्वतः अशोक चव्हाण यांनी हायकमांडकडे शब्द टाकल्याची देखील राजधानीत चर्चा आहे. मात्र पक्षश्रेष्ठींनी नाना पटोले यांच्यावर विश्वास दाखवला आहे. मात्र त्यांना प्रदेशाध्यक्षपदासह मंत्रीपद मिळेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.