Congress | Nana Patole – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा देण्याची ही योग्य वेळ नाही. हा फक्त प्रदेशाध्यक्षपदाचा मुद्दा नसून हा निवडणुकीत झालेल्या हेराफेरीचाही मुद्दा आहे. त्यामुळे आता तुम्ही राजीनामा देऊन मीडियासमोर चुकीचा नरेटिव्ह सेट करु नका, असे काँग्रेस हायकमांडकडून सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावर कायम राहा, असे सांगतानाच हायकमांडच्या निर्णयाची प्रतीक्षा करा. विधानसभेच्या पराभवाचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असा सल्ला दिल्याची माहिती आहे. काँग्रेस हायकमांडने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीत बोलवले. त्यांच्या हायकमांडसोबतच्या चर्चेनंतर ते प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर काही माध्यमांमध्ये नाना पटोले यांनी राजीनामा दिला अशा बातम्या सुरू होत्या. नाना पटोलेंनी राजीनामा दिलेला नाही. यासंदर्भातल्या बातम्या असत्य असून त्या खोडसाळपणे पसरवल्या जात आहेत. असे काँग्रेसच्या मिडिया सेलकडून सांगण्यात आले होते. त्यातच आता काँग्रेस हायकमांडने दिलेल्या आदेशानुसार पुढील निर्णय होईपर्यंत नाना पटोले हेच प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार आहेत.