Nana Patole : “भाजपच्या शेतीविरोधी धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत’; नाना पटोले यांचा गंभीर आरोप

Nana Patole – भाजप सरकार (bjp government) हे शेतकरीविरोधी आहे. शेतकऱ्याकडे (Farmer) शेतमाल आला की बाजारात किंमती पाडून शेतकऱ्यांना भाव मिळू दिला जात नाही. कांदा, सोयाबीन, धान, कापूस, डाळ कोणत्याच पिकाला भाव मिळत नाही.
भाजपच्या शेतीविरोधी धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmer suicides) वाढत आहेत. आता या सरकारचे काऊंट डाऊन सुरु झाले असून शेतकऱ्यांच्या आशिर्वादानेच केंद्रातील व राज्यातील सरकार बदलणार आहे, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.
अकोला दौऱ्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी पटोले यांनी राज्यातील बेरोजगारी, वाढत्या आत्महत्या, मराठा आरक्षण यासह विविध प्रश्नांवरून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.
नाना पटोले म्हणाले, सरकारने शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. पण सरकार फक्त वीमा कंपन्या व कारखानदारांचे हित जोपासत आहे. केवळ खोटे बोलणे आणि जुमलेबाजी करणे एवढेच काम भाजपने केले आहे.
राज्यात दुष्काळाची स्थिती आहे, सप्टेंबर महिन्यापासून पाण्याच्या टॅंकरची मागणी होत आहे. पण सरकार दुकाष्ळ जाहीर करत नाही. कॉंग्रेस पक्ष शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करेल आणि हिवाळी अधिवेशनातही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जातील.
भाजपा खोटे बोलून सत्तेत आला आणि जनतेला दिलेली सर्व आश्वासने विसरला. भाजप हा जुमेलबाजी करणार पक्ष आहे. परंतु आता जनता या जुमलेबाज भाजपा सरकारला कंटाळली आहे. भाजप सरकारने 10 वर्षे सत्ता भोगली.
पण केवळ मित्रांचा विकास केला आता त्यांचे काऊंटडाऊन सुरु झाले असून राज्यात व केंद्रातही बदल होऊन जनतेच्या हिताचे रक्षण करणारे सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राचा “उडता पंजाब’
महाराष्ट्राला आज “उडता पंजाब’ करण्याचे पाप भाजप सरकार करत आहे. नाशिकसह राज्यातील इतर भागातही ड्रग्ज मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. मुलांना ड्रग्जच्या माध्यमातून बरबाद करण्याचे काम केले जात आहे.
ड्रग्ज माफिया ललित पाटीलला ससून हॉस्पिटलमध्ये सर्व सोयीसुविधा पुरवल्या जात होत्या. या ड्रग्ज माफियाला सरकार पाठीशी का घालत आहे, असा सवालही त्यांनी केला.





