अर्थात : आभासी नोकर्यांचं जाळं
– डॉ. डी. एस. काटे
शिकलेले लोक नोकरीच्या आमिषाने फसवणुकीला बळी पडतात, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. आपली फसवणूक होऊ शकते, असा विचार जरी डोक्यात आला, तरी तुम्ही सावध होऊ शकता.
बनावट नोकरी देणार्या टोळीकडून तरुणांना चार कोटी रुपयांना गंडवलं, अशी बातमी! हे तरुण शिकले-सवरलेले उच्चविभूषित! आई-वडिलांनी लाखो रुपये खर्च करून त्यांना शिकवलं. पण त्यांनी परिपूर्ण विद्या आकलन केली का? अर्थात त्यांनी ती प्राप्त केली का? सजग भारतीय नागरिक म्हणून समाजात वावरू शकले का? असे प्रश्न उद्भवतात.
महात्मा फुले यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘इतके अनर्थ एका अविद्येने केले’. होय, कारण की शिक्षण घेऊन असे तरुण बनावट व खोट्या नोकर्या देणार्यांच्या टोळ्यांचे सावज होत आहे. लाखो रुपये देऊन स्वतःहून फसवणूक करून घेतात. मग त्यांना अशा घोटाळ्यापासून खरं-खोटं/लबाड/फसवणूक/गंडवणे/ माहिती नव्हते का? म्हणजेच ते शिकले-सवरलेले असूनसुद्धा व्यावहारिक व सामाजिक ज्ञानामध्ये ते नक्कीच अडाणी आहेत. डोक्यामध्ये अविद्याच भरलेली आहे, अशातला हा प्रकार आहे. व्यवहारसाक्षरता व अर्थसाक्षरतासुद्धा शिकले पाहिजे. यामुळे तरुणवर्ग यापुढे अशा मोहजालापासून दूर राहील.
विकास तंत्रज्ञान/लोकभावना/ आवडीनिवडी/झटपट फॅशन बदल/ नवनिर्मिती यामध्ये प्रचंड बदल जगात जाणवतो. नेमका हेच विद्या घेणारे शिक्षण पद्धतीनुसार पूर्ण ज्ञानाला वंचित राहतात. चकाचक राहणीमान/बडेजाव/बाह्य सौंदर्य प्रदर्शन/मोठेपणाचा/भौतिक सुख व समृद्ध याची भोगी वृत्ती ही आज तरुणांना भुरळ घालते. त्यामुळे झटपट श्रीमंत/ताबडतोब मोठ्या पगाराच्या नोकर्या याचे मार्ग शोधत फिरतात.
कष्ट करण्यास कोणी धजावत नाही आणि मग पैसे देऊन असले शॉर्टकट मार्ग तरुण शोधतात. मग जाळं विणणारी व फसवणूक करणारे स्कॅमर बरोबर अलगदपणे अशा तरुणांना भुरळ पडेल अशी जाहिरात करतात, डायरेक्ट ऑर्डर घ्या! भरतीपूर्व परीक्षेची जरूर नाही! मेरीटची जरूर नाही! पगारही भरपूर मिळेल! या आमच्याकडे आम्ही नोकरीला लावतो, तुमच्या आयुष्याची चिंता मिटून जाईल. अशी जाहिराती करून आपला कार्यभाग उरकून टाकतात.
बदल हा निसर्ग नियम आहे. जेवढा विकास होतो त्याच पटीमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती लोकांमध्ये बळकावत चालते. नोकरी शोधणार्यांची संख्या वाढली तशीच त्यांना फसवणार्यांची संख्याही वाढत आहे. पुरवठा अर्थात लोकांची मागणी पूर्ण करण्यासाठी खर्या-खोट्या प्लेसमेंट कंपन्या त्याचबरोबर ऑनलाइन स्कॅनर यांचेही अमर्याद पेव फुटले आहे.
फसवं जाळे टाकून ऑनलाइन वर्क/वर्क फ्रॉम होम/कमी वेळात नोकरी/जास्त पगार/हवी तशी सुट्टी/अशा आभासी स्वप्नरूपी आकांक्षासाठी तरुणांना भुलवले जाते. त्यांचे दलालसुद्धा वावरताना उच्च राहणीमान त्याचबरोबर संभाषण कौशल्य व प्रतिष्ठित लोकांसोबत काढलेले फोटो त्याचबरोबर मंत्री/मोठे अधिकारी यांची ओळख दाखवून आकर्षित केले जाते.
मोठ्या कार्पोरेट कंपन्यांना लाजवेल असे त्यांचे मॅनेजमेंट असते. यामुळे तरुण लवकरात लवकर त्यांच्या जाळ्यात अडकला जातो. खोटी नियुक्तीपत्र दिल्यानंतर सर्व माहिती त्या फसव्या लोकापर्यंत जाते. कागदपत्रेही त्यांच्यापर्यंत जातात. आपली संपूर्ण पार्श्वभूमी ते विचारून घेतात. त्यामुळे उमेदवाराकडून किती पैसे घ्यायचे आणि कुठपर्यंत याचा फास आवळायचा याचं मानसिक ज्ञान ह्या चोर लोकांना अवगत असतं. यामुळे नोकरी मागणारे सहजासहजी संमोहित करण्याची कला त्यांच्याकडे असतेच.
स्कॅमरला लाखो रुपये देऊन बसतात. तरुणांच्या ओळखीसाठी व मुलाखतीसाठी मोठी स्टार हॉटेल/स्कॅमर कंपनीतील लखलखीत दालने/त्यांचे राहणीमान/ उत्कृष्ट जेवणाची पद्धत/यामुळे भोळे तरुण अडकले जातात. सरकारी खात्याचे तसेच खासगी कंपनीचे नियुक्तीपत्र लेटरहेड वापरून उमेदवाराला मुलाखतीचे पत्रही देतात. पुढे थातूरमातूर कारण सांगून परत पैसे लुटले जातात. तुमच्या नियुक्तीच्या वेळेस अर्थात अपॉइंटमेंटला तुम्हाला पैसे द्यावे लागतील म्हणून पुनःपुन्हा पैशांची लूट चालूच राहते. जेव्हा पूर्ण पैसे लुटले जातात तेव्हा ते संपर्क, फोन नंबर, कार्यालय, ई-मेल सर्व काही बंद करतात आणि पळ काढतात.
त्यानंतर आपली फसवणूक झाली आहे हे या तरुणांच्या लक्षात येते. फसवणूक झालेले काही तरुण बदनामीमुळे तर काही अज्ञानामुळे गुपचूप राहतात व गप्प बसतात. पण काही थोडेफार पोलिसात तक्रार करतात; पण योजनेवरील ताण/ वाढती आर्थिक गुन्हेगारी/त्यातून दाखल होणारी असंख्य प्रकरणे/खटले यांचा ओघ जास्त असल्यामुळे पोलिसास ह्या गुन्ह्याचा तपास तडीस लावणे मोठे काम होऊन बसले आहे. डिजिटल सराईत घोटाळेबाज लोक असल्यामुळे अजून त्यामध्ये अडचणी निर्माण होतात.
खरंतर एकदा गेलेला पैसा परत येणे महाकठीण हा अर्थव्यवस्थेचा नियम आहे. गुन्हे दाखल केल्यानंतरही पैसे मिळण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने हा नियम लागू पडतो. आपल्या पात्रतेप्रमाणे काम करणे, सरकारी व खासगी संकेतस्थळ याची खात्री करून घेणे, नि:संकोचपणे तज्ज्ञाशी भेट घेऊन त्यांना या जाहिरातीबद्दल विचारणे, अर्थात नोकरीची प्रक्रिया समजून घेणे ही सर्व पडताळणी झाल्यानंतरच आपण नोकरीसाठी निश्चितच पात्र राहाल. सगळीकडे ऑनलाइन परीक्षा त्याचबरोबर प्रक्रियाही ऑनलाइन झाल्यामुळे सध्या तरी पारदर्शकता जाणवते. नोकरी देणारे, पैसे घेऊन वशिला लावणार्यांच्या आणि नोकर्यांच्या आभासी जाळ्यामध्ये अडकू नका.





