Naman Dhir Debut : आशियाड गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीचा पत्ता कट! श्रेयस अय्यरच्या संघात अचानक मुंबई इंडियन्सच्या खेळाडूची सरप्राईज एन्ट्री
Naman Dhir Debut : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी२० सामना लखनौ येथील एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू नमन धीरला या सामन्यात पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे.

Naman Dhir Debuts Vaibhav Sooryavanshi Dropped in IND vs WI 1st T20I : वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या (MI) स्फोटक अष्टपैलू नमन धीरला (Naman Dhir) आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्येही संधी मिळाली आहे. लखनौ येथील एकाना स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने नमनला पदार्पणाची मानाची कॅप दिली. यापूर्वी एकदिवसीय पदार्पणाची कॅप त्याला विराट कोहलीच्या हस्ते मिळाली होती.
गंभीरच्या काळात पॅटर्न बदलला; वैभव सूर्यवंशीसह चौघांना डच्चू!
नाणेफेक जिंकून कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतासाठी सलामीला खेळणाऱ्या युवा वैभव सूर्यवंशीला मात्र प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. झिम्बाब्वेनंतर आशियाडमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनाखाली चमक दाखवणाऱ्या वैभवला गौतम गंभीरच्या कोचिंगखाली बाहेर बसावे लागले. वैभवसह रवी बिश्नोई, नितीश कुमार रेड्डी आणि प्रिन्स यादव यांनाही पहिल्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही.
मुंबई इंडियन्सकडून आयपीएल गाजवले; ३७ सामन्यांत ७१० धावा!
Another #TeamIndia Cap to cherish and celebrate 🧢👏
All smiles as Naman Dhir receives his T20I debut cap from Arshdeep Singh 🙌
Updates ▶️ https://t.co/2czVyKWreK
#INDvWI | @mflone_ https://t.co/LrmwyiKBxv
— BCCI (@BCCI) October 6, 2026
नमन धीर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाब आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून सातत्याने खेळत आहे. त्याने आतापर्यंत २० प्रथम श्रेणी आणि ६१ टी-२० सामने खेळले आहेत. २०२४ पासून मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा भाग राहिलेल्या नमनने ३७ आयपीएल सामन्यांत ७१० धावा केल्या आहेत. तसेच नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२६ च्या हंगामात त्याने मुंबईकडून सर्वच्या सर्व १४ सामने खेळताना ३१८ धावांचे योगदान दिले होते.
६४ चेंडूंत १७३ धावांचे तुफान; राष्ट्रीय संघात मिळवून दिली थेट एन्ट्री!
नमन धीरच्या कारकिर्दीला खरा टर्निंग पॉईंट शेर-ए-पंजाब टी-२० लीगमुळे मिळाला. अमृतसर सूरमाजकडून खेळताना त्याने १० सामन्यांत ७२.७८ च्या सरासरीने आणि २१७.६१ च्या स्ट्राईक रेटने ६५५ धावा कुटल्या होत्या. मोहालीतील पीसीए स्टेडियमवर त्याने मोहाली किंग्जविरुद्ध अवघ्या ६४ चेंडूंत १७३ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली होती. याच तुफानी कामगिरीच्या जोरावर त्याला आधी एकदिवसीय संघात आणि आता थेट आंतरराष्ट्रीय टी-२० संघात पदार्पणाची संधी मिळाली.





