Nagpur Blast – डोंबिवलीमध्ये घडलेल्या दुर्घटनेपाठोपाठ आज नागपुरच्या धामणामध्ये दारु गोळा बनवणाऱ्या कंपनीत स्फोट झाल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत पाच महिलांसह सहा कामगारांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. धामणामधील चामुंडा कंपनीत स्फोट झाल्याची माहिती समोर येत असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागपूर शहरातील धामणा या परिसरात चामुंडा एक्सप्लोसिव्ह ही दारु गोळा तयार करणारी कंपनी आहे. या कपंनीमध्ये गुरुवारी (13 जून) दुपारी दीड वाजताच्या सुमारास स्फोट झाला. हा स्फोट झाला त्यावेळी या कंपनीमध्ये 10 ते 12 कामगार काम करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. हा स्फोट इतका भीषण होता की यात सहा कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तीन जण गंभीर जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सध्या जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या नातेवाईकांनी कंपनी परिसरात एकच गर्दी केली आहे. तसेच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणली आहे. परंतु कंपनीत मोठ्या प्रमाणात स्फोटक असल्याने आतमध्ये कुणालाही सोडण्यात आलेले नाही. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनीही घटनास्थळाला भेट दिली. एका पोलीस अधिकाऱ्यांने सांगितले की, स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे. कामगारांनी स्फोटकांचा स्टॉक बनवला होता. हा स्टॉक 24 तासांनी दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येणार होता. पण स्टॉकमध्ये स्पार्क झाला की आग लागली यासंदर्भात अद्याप माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, कंपनीत झालेल्या भीषण स्फोटानंतर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या कारखान्याचे मालक आणि व्यवस्थापक बेपत्ता असून स्फोट झाल्यानंतर कोणतीही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती, असा दावा त्यांनी केला. तसेच कंपनीतील स्फोटाच्या विरोधात नागरिकांनी नागपूर-अमरावती महामार्गावर चक्काजाम केला. यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या नागरिकांना ताब्यात घेतले आहे.