Nagpur Accident : नागपूरमध्ये ट्रकच्या धडकेत कारचा भीषण अपघात ; सहा जणांचा जागीच मृत्यू

Nagpur Accident : नागपूरच्या काटोल तालुक्यात भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. ताराबोडी परिसरात हा अपघात झाला असून भरधाव वेगात एका कारने ट्रकला धडक दिल्यामुळे ही दुर्घटना झाली असल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. कारमधून प्रवास करणाऱ्या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्व सहा जण हे नागपूरच्या काटोल तालुक्यातील रहिवासी होते.
शुक्रवारी १५ डिसेंबरच्या मध्यरात्री सोनखांब ते ताराबोडी दरम्यानच्या भागात ही अपघाताची घटना घडली. नागपूरमधून सहा जण एक लग्नसोहळा आटोपून रात्री पुन्हा आपल्या गावी परत जात होते. त्यांची कार भरधाव वेगात असताना एका ट्रकला वेगाने धडकली.
या अपघातात कारचा चुराडा झाला. ट्रकच्या उजव्या भागाचेही मोठे नुकसान झाले. कारमध्ये बसलेल्या सहा जणांचा यात मृत्यू झाला. गावातील चंद्रशेखर चिखले यांच्या मुलीचे नागपुरात लग्न होते. त्यासाठी हे सर्वजण नागपूरला गेले होते.
या अपघातात मयूर इंगळे , वैभव चिखले , सुधाकर मानकर , विठ्ठल थोटे , अजय चिखले व रमेश हेलोंडे यांचा मृत्यू झाला. जगदीश ढोणे यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. मृत व जखमी असे सर्वजण मेंढेपठार गावातील रहिवासी होते.





