नगर : प्रभू श्रीरामचंद्राच्या जयघोषाने अवघी सहकार पंढरी दुमदुमली

राहाता – प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतील मंदिराच्या ऐतिहासिक कार्यक्रमा करीता काढण्यात आलेल्या मंगल अक्षदा कलश शोभायात्रेचे जोरदार स्वागत लोणी बुद्रूक येथे करण्यात आले. प्रभू श्रीरामचंद्राच्या जयघोषाने अवघी सहकार पंढरी दुमदूमून गेले.
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात या यात्रेच्या निमित्ताने वातावरण राममय झाले असून, लोणी बुद्रुक गावात शनिवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. प्रारंभी महंत उध्दव महाराज मंडलिक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर नगर जिल्हा सहकार्यवाहक योगेश कुमावत, रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्ष धनश्री विखे पाटील, सरपंच कल्पना मैड यांच्यासह मान्यवरांनी यात्रेचे स्वागत करून कलशाचे पूजन केले.
या निमित्ताने यात्रेची सवाद्य मिरवणूकही काढण्यात आली. झांज पथक, भजनी मंडळ तसेच पारंपारिक वाद्यांबरोबरच प्रभू श्रीरामचंद्राचा जयघोषित करीत काढण्यात आलेल्या मिरवणूकीमध्ये माजी उपसरपंच अनिल विखे, ह.भ.प भारत महाराज धावणे, प्रविण विखे, दिलीप विखे, गणेश विखे,
रामभाऊ विखे, चेअरमन नंदू राठी, भाऊसाहेब धावणे, अशोक धावणे, संतोष विखे, भाऊसाहेब विखे, विजय लगड, किशोर धावणे, रविंद्र धावणे आदींसह सर्व ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते महिला, शालेय विद्यार्थी भगव्या टोप्या झेंडे घेऊन उत्साहाने या यात्रेत सहभागी झाले होते.





