नगर : कोपरगावमध्ये दोन गटांत हाणामारी परस्परविरोधी गुन्हे दाखल

कोपरगाव : कोपगाव शहरातील गांधीनगर भागात लहान मुलांच्या खेळण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर दोन गटात तुंबळ हाणामारीत झाले. त्यात पाचजण जखमी झाले. कोपरगाव शहर पोलिसांत एकमेकांच्या विरोधात तक्रारी देण्यात आल्याने पोलिसांनी दोन्ही गटांतील हाणामारी करणाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे.
शोएब आसिफ पठाण (रा. गांधीनगर) यांच्या फिर्यादीवरून सनी गायकवाड, सनी मंजुळ, शंकर मोरे, वैभव कु-हाडे, राहुल चवंडके, ऋषी बारहाते ,अभी बचडे व इतर ७ ते ८ जण असे बेकायदेशीर मंडळी जमवून रविवारी सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान आचारी हाॅस्पिटल येथे येऊन तलवार, कोयते, हाॅकी स्टीकने मारहान करून तोशीफ अकील पठाण शोयब करीम शेख, मतिन झाकीर सय्यद ,अरशद अमिन पठाण,आवेश मुश्ताक शेख यांना जबर मारहाण करून जखमी केले. लहान मुलांच्या खेळण्यावर वाद झाला होता. त्यावरून हाणामारी केल्याची तक्रार केली आहे.
दरम्यान, दुसऱ्या गटातील योगेश छबुराव शिंदे यांच्या तक्रारीवरून शोयब करीम शेख, अरशद अमिन पठाण, तोशीफ अकील पठाण, थीफईक शेख , फैज्जू सय्यद व इतर अनोळखी इसमांनी बॅट, लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीचा भाचा हा गांधीनगर येथील शंकर गार्डनमध्ये खेळत असताना किरकोळ कारणावरून वाद झाला. वरील आरोपींनी येऊन भाच्याला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार शिंदे यांनी केली आहे. यावरून पोलिसांनी दोन्ही गटातील तक्रारीची नोंद घेऊन मारहाण करणाऱ्यांचा शोध घेत आहे. या वादामुळे शहरातील सामाजिक शांतता भंग झाली. हाणामारी करणाऱ्यांमध्ये राजकीय पक्षांचे पदाधिकारी असल्याची चर्चा आहे.





