Nagar : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड बाळगू नये

नेवासा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना व स्पर्धा परीक्षा देताना कोणताही न्यूनगंड बाळगू नये. आपण ग्रामीण भागातील आहोत ही तमा न बाळगता जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या जोरावर आकाशाला गवसणी घालून आपल्या आई – वडिलांच्या कष्टाचे चीज करावे. बारावीनंतर माझ्या ऊसतोड आई-वडिलांच्या हातातील कोयता बंद करायचा हा निर्धार मी मनी बाळगला. आज ग्रामीण भागातील असूनही नेवासा येथे पोलीस उपअधीक्षक पदावर हजर झालो. हाच निर्धार सर्व विद्यार्थ्यांनी बाळगावा व आई-वडिलांना सुखी करावे, असे प्रेरणादायी विचार पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी व्यक्त केले.
भानसहिवरे येथील प्राथमिक शाळेत स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यात मार्गदर्शन करताना खाडे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर नेवासा पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर जोजार, माजी सरपंच अशोक बोरा, शिक्षण विस्तार अधिकारी रुकसाना शेख, केंद्रप्रमुख सुखदेव सोनवणे, डॉ.जे. ई.नरवडे, डॉ.संतोष ढवान, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ.अशोक भोईटे, माजी मुख्याध्यापिका सुनंदा इधाटे, मुख्याध्यापक रामचंद्र गजभार, भोईटे गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य संदीप तळपे उपस्थित होते.
यावेळी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचा चांगला क्लास घेतला. टीव्ही पाहणार का? टुकार मुलांबरोबर फिरणार का? भांडण करणार का? पुस्तके फाडणार का? स्वाध्याय पूर्ण करणार का? या प्रश्नांची मुलांनी हजरजबाबीपणाने समर्पक दिलेली उत्तरे ऐकून भानसहिवरे गावातील लोक सुशिक्षित आहेत व शाळेतील मुले ही हुशार आहेत, असे गौरवद्गार काढले. यावेळी टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
यावेळी उपसभापती किशोर जोजार यांनी विद्यार्थ्यांना 25 हजार रुपये किमतीचे दप्तर, पाटी, अंकलिपी असे शालेय साहित्य वाटप केले. मातोश्री हॉटेलचे संचालक दत्ता नवले यांनी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांना सुरुची भोजन दिले. सूत्रसंचालन डॉ.रेवननाथ पवार यांनी केले.





