Nagar : प्रेयसीला भेटायला गेलेल्या युवकाचा खून

अकोले : प्रेयसीला भेटायला आलेल्या तरुणास मुलीच्या नातेवाईकाने पाहिले. लाकडी दांडक्याने हातपाय व पाठीवर मारहाण करत जिवे मारून टाकल्याची घटना अकोले तालुक्यातील पळसुंदे येथे घडली. नवनाथ तुकाराम पडवळे (वय 19 रा. पांगरी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. नुकतीच १२ वी परीक्षा तो पास झाला होता. प्रेयसीचे नातेवाईक योगेश यशवंत दुटे (रा. पळसुंदे ता. अकोले) याच्यावर खून केल्याप्रकरणी अकोले पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मयत नवनाथ याचे वडील तुकाराम भावका पडवळे (रा. पांगरी, ता.अकोले) यांनी अकोले पोलिसांत फिर्याद दिली. मुलगा नवनाथ हा मॉर्डन हायस्कूल, अकोले येथे इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. नवनाथ याचे पळसुंदे येथील योगेश यशवंत दुटे यांची भाचीसोबत प्रेम प्रकरण चालू असल्याचे मला दोन महिन्यांपूर्वी समजले होते.
त्याला तू शाळा शिक, दुसरे उद्योग नको असे समजावून सांगितले होते. त्यानंतर दि. ५ मे रोजी मेव्हणे भागा महादु दिघे यांचे मुलाचा साखरपुडा व हळदीचा कार्यक्रम नागमळा, सातेवाडी येथे असल्याने आम्ही सर्वजण कार्यक्रमाला गेलो होतो. हळदीचा कार्यक्रम संपल्यानंतर मुलगा नवनाथ , मला मोटार सायकल द्या, तुम्ही व आई येथेच मुक्कामी थांबा, असे सांगून रात्री 11.30 वाजता घरी जातो, असे सांगून गाडीवर गेला.
त्यानंतर तो त्याचे प्रेमसंबंध असलेल्या मुलीस भेटण्यास पळसुंदे येथे गेला असता योगेश दुटे याने पाहिले. मुलगा नवनाथ यास पकडून त्यास लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून त्याचा खून केला.





