Nagar : जामखेड तालुक्यातून अनेक मुली “सैराट”

जामखेड : सध्याच्या काळामध्ये मुली पळून जाण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जामखेड तालुक्यातही काही वेगळी परिस्थिती नसून मुली पळून जात असल्याने पालकवर्ग चिंतेत आहे. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने मुलींकडून चुकीचे पाऊले पडत असून, तालुक्यात अनेक नेत्याच्या कार्यक्रमानिमित्ताने तरुणांना खुश करण्यासाठी गौतमी पाटील यांचा नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन होते. मात्र, सध्या समाजात बाप लेकीमध्ये अनेक कारणांमुळे दुरावा निर्माण होत आहे. याचा परिणाम म्हणून मुली पळून जाऊन वडिलांच्या इच्छेविरोधात लग्न करताना दिसून येत आहेत. त्यामुळे समाजात मुली व वडील या पवित्र नात्याला छेद मिळत आहे. त्यामुळे समाज परिवर्तन घडवून आण्यासाठी व्याख्याते तथा समाजप्रबोधनकार वसंत हंकारे यांच्या खडे बोल व्याख्यानाची गरज निर्माण झाली आहे.
सध्याचे युग हे सोशल मीडिया, मोबाईल, टेलिव्हिजनचे आहे. यामुळे आपल्या किशोरवयीन मुलींच्या मनावर विचित्र परिणाम होत आहेत. जामखेड शहरातील चौकाचौकांनी शाळा, क्लासेस, कॉलेजसमोर टवाळखोर रोडरोमिओ मुलींचा पाठलाग करत असताना आपण नेहमी पाहतो. त्याबरोबर अनेक मुली घरदार सोडून पळून जाण्यास धन्यता मानत असून, पालकांकडून नाइलाजास्तव पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागते. मात्र, बदनामीच्या भीतीने अनेक जण गुन्हाही दाखल करत नसल्याचे चित्र उभे आहे. त्यातच मुलींना योग्य वयात योग्य मार्गदर्शन मिळत नसून, याला काही प्रमाणावर पालकवर्गही जबाबदार आहे.
आपली मुलगी कुठे जाते, काय करते, मोबाईलवर कोणाशी बोलते, याकडे वेळीस लक्ष न दिल्याने मुली पळून जाण्याच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. मुली पळून गेलेल्या कुटुंबीयांवर समाजासमोर खाली मान घालून जाण्याची वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणूनच यावर एकमेव उपाय म्हणजे तालुक्यात मुलींचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. जेव्हा मुली मनोमन विचार आत्मसात करतील तेव्हाच समाजातील चित्र बदलेल आणि निश्चितच आई-वडिलांना मनस्ताप देणे तसेच अनुचित प्रकार कुठेतरी थांबेल या हेतूने महिला व मुलींचे समुपदेशन काळाची गरज बनली आहे, यासाठी सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाची गरज आहे.
हंकारे यांच्या व्याख्यानात अनेक उदाहरणे, काळजाला भिडणारे शब्द व प्रखर विचार आपल्या परिवर्तनवादी शब्दातून हंकारे यांनी मांडले. उपस्थित विद्यार्थिनी, बहुसंख्येने आलेला पालकवर्ग, महिला अक्षरशः ढसाढसा रडतात. पौगंडावस्थेत शरीरात प्रचंड बदल होत असतात. मनाची अवस्था देखील बदलत असते. या काळात मुलामुलींना प्रामुख्याने शारिरीक आकर्षण वाटत असते. पण यावेळी आपले भविष्य घडविण्यासाठी मुलांनी आपल्या मनावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, याबाबत सखोल मार्गदर्शन करणारी आणि आई, बाबा आणि कुटुंबासमवेत नाते दृढ करणारी दुवा म्हणजे वसंत हंकारे यांचे व्याख्यान आहे.
तालुक्यात अनेक राजकीय पुढारी आपल्या व नेत्याच्या वाढदिवसाला गौतमी पाटील यांच्या नृत्याच्या कार्यक्रमाला लाखो रुपये वायफळ खर्च करतात. या कार्यक्रमातून समाजाला काहीच प्रबोधन होत नसून उलट तरुणपिढी बिघडत चालली आहे. त्यामुळे आगामी काळात नृत्याच्या कार्यक्रमापेक्षा समाजप्रबोधनपर व्याखान्याचे कार्यक्रम आयोजित करण्याची मागणीही सुजाण नागरिकांकडून होत आहे.





