नगर : सौर ऊर्जा प्रकल्पास स्थानिक मच्छीमारांचा विरोध

आमदार शंकरराव गडाख यांना साकडे : निसर्ग व मानवी जीवितास धोका
नेवासा – नाथसागर (जायकवाडी) जलाशयावरील नियोजित तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प मच्छीमारांच्या उदरनिर्वाह आणि आरोग्यावर दुष्परिणाम करणारा असल्याने तसेच पशू, पक्षी, जलचारांच्या अस्तित्वावर घाला घालणारा असल्याने या प्रकल्पास मंजुरी देऊ नये, अशा मागणीचे साकडे आमदार शंकरराव गडाख यांच्याकडे समक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे घालण्यात आले आहे.
य नाथसागर जलाशय पात्रात पारंपरिक मासेमारी व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांनी म्हटले आहे की, नाथसागर जलाशयातील सुमारे 15 हजार हेक्टर क्षेत्रावर तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा घाट घातला जात असून त्यासाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन या शासकीय संस्थेच्या माध्यमातून जिओ सर्व्हिसेस मेरिटाईम प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीमार्फत सर्व्हे करण्यात येत आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्यास या जलाशयातील मासेमारीवर पूर्णतः बंदी येण्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
स्वाभाविकच या प्रकल्पामुळे मासेमारीवर उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्या लाखो कुटुंबांवर उपासमारीची वेळ ओढवणार असून या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर रेडिएशन तयार होऊन त्याचा या परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यावर विपरीत दुष्परिणाम होऊन त्यांना दुर्धर आजारांनी ग्रासण्याचा धोका यात विषद करण्यात आला आहे.
शिवाय या जलाशयात वर्षातून चार वेळा प्रजनन क्षमता असलेल्या चिलापी जातीच्या माशांची उत्पत्ती प्रचंड प्रमाणात वाढल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे मासेमारीवर बंधने आल्यास चिलापी माशांची पैदास बेसुमार वाढून इतर जातींच्या माशांसह सर्वच जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न उद्भवणार असल्याची बाब यात निदर्शनास आणून देण्यात आली आहे. जायकवाडी पक्षी अभयारण्यातील पक्षांचे खाद्य हेच चिलापी माशांचे प्रमुख अन्न असल्याने मासेमारी बंद झाल्यास या पक्षांचे अस्तित्व धोक्यात येऊन जलाशयातील प्रदूषण वाढल्याने हे पाणी मानवी आरोग्य तसेच सिंचनासाठी घातक ठरण्याचा धोका यात विषद करण्यात आला आहे.
नाथसागर जलाशयाचा पाणीसाठा 36 हजार हेक्टर क्षेत्रावर होत असला तरी यातील 70 टक्के पाणी साठा वापरला जात असल्याने दरवर्षी जून महिन्याच्या अखेरीस फक्त 30 टक्के मृतसाठा शिल्लक राहत असल्याची बाब यानिमित्ताने प्रकर्षाने निदर्शनास आणून देण्यात आली आहे. यामुळे धरणातील पाणी झाकले जाऊन या पाण्यास गटारीचे स्वरूप येऊन रोगराई वाढून निसर्गाची अपरिमित हानी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
माजी मंत्री व आमदार गडाख यांनी याप्रश्नी लक्ष घालून नाथसागर जलाशयावरील नियोजित तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पास मंजुरी मिळू देऊ नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याप्रसंगी जैनपूर, वरखेड, रामडोह या नेवासा तालुक्यातील गावांमधील तसेच संभाजीनगर येथील मासेमारी करणारे नागरिक उपस्थित होते.





