Hingoli News : पानकनेरगाव येथील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्यासाठी ग्रामस्थांकडून रास्ता रोको आंदोलन

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे गायरान जमिनीवर प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात गावकऱ्यांनी आज (५ जानेवारी २०२६) सकाळी १० वाजता सेनगाव-रिसोड महामार्गावरील पानकनेरगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलन एवढे तीव्र होते की, आंदोलकांनी “आम्हाला गोळ्या घाला, पण मागे हटणार नाही” अशी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. नायब तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
गावातील सुमारे ३०० एकर गायरान जमीन गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात होती. गावकऱ्यांनी गेल्या तीन-चार वर्षांपासून अतिक्रमण हटवण्यासाठी वारंवार आंदोलने केली होती. थोडेफार यश मिळाल्यानंतर प्रशासनाने ही जमीन सौर ऊर्जा प्रकल्पासाठी उद्योगपतीला देण्याचा निर्णय घेतल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. गायरान जमीन संपुष्टात आल्यास गुराढोरांसाठी वैरणाची गैरसोय निर्माण होईल, तसेच वन्य प्राण्यांची वसाहत वाढून ते शेतात येतील, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
३१ डिसेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन देऊन ५ जानेवारीला आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आज शेकडो गावकरी महामार्गावर उतरले. आंदोलकांनी “गायरान जमीन उद्योगपतीच्या घशात जाऊ देणार नाही, गुराढोरे व खाटकाळ विकायचे का?” असे तीव्र सवाल उपस्थित केले.
नायब तहसीलदारांनी लेखी आश्वासन दिले की, उर्वरित अतिक्रमण हटवले जाईल आणि सौर ऊर्जा प्रकल्प थांबवला जाईल. मात्र, ७ दिवसांत काम थांबले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवरून उड्या मारून आत्महत्या करू, असा गंभीर इशारा आंदोलकांनी दिला.
आंदोलनाला क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने पूर्ण पाठिंबा दिला गेला. संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, सेनगाव तालुकाध्यक्ष प्रवीण मते यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.
आंदोलनस्थळी पोलीस सहायक निरीक्षक दीपक मस्के, बीट जमादार राजेश जाधव, तुकाराम मार्कळ यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त तैनात होता. आंदोलन शांततेत पार पडले, तरी गावकऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासन कितपत गांभीर्याने लक्ष देईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





