उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थित शेतकरी मेळावा
कोपरगाव – सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या 2023-24 च्या 69 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मंगळवार (दि.24) रोजी दुपारी 12 वाजता ज्येष्ठ संचालक, माजी आमदार अशोकराव काळे यांचे अध्यक्षतेखाली तसेच संचालक सूर्यभान कोळपे व त्यांच्या सुविद्य पत्नी चंद्रकला कोळपे यांच्याहस्ते विधिवत पूजन करून कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
यानिमित्ताने कारखाना कार्यस्थळावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळावा आयोजित केल्याची माहिती कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी दिली.
मागील वर्षी कारखाना विस्तारीकरणाचे पहिल्या टप्प्यातील 100 टन क्षमतेचा बॉयलर, 8 मेगावॅटचे टर्बाईन व चार मिलचे काम पूर्ण करून 68 वा गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. यावर्षी दुसऱ्या टप्प्यात बॉयलिंग हाऊसची उभारणी करण्यात येऊन उभारणीचे काम देखील पूर्ण झाले असून पूर्णपणे आधुनिकीकरणाच्या माध्यमातून 69 वा गळीत हंगाम सुरू करण्यास कारखाना सज्ज झाला आहे.
या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन व्हा.चेअरमन डॉ. मच्छिंद्र बर्डे यांनी केले आहे.