Nagar : मोकाट बिबट्यांना लवकरात लवकर जेरबंद करा

पारनेर: पारनेर तालुक्यातील देसवडे, मांडवे, खडकवाडी, टाकळी ढोकेश्वर, कर्जुले हर्या, पोखरी या गावांमध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून लवकरात लवकर या मोकाट बिबट्यांना जेरबंद करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन अहिल्यानगरचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांना दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिवसाढवळ्या बिबटे पाळीव प्राण्यांसह मानवांवर भ्याड हल्ले करत आहेत. नुकतेच खडकवाडी येथे चिमुकल्या शाळकरी मुलीवर बिबट्याने हल्ला करत तिचा बळी घेतला. तसेच देसवडे येथेही भर सकाळी योगेश गोळे या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले. बिबट्यांच्या या हल्ल्याने परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ अक्षरशः भयभीत झाले आहे. विशेषत; शेतकऱ्यांना रात्री – अपरात्री शेतात पाणी भरण्यासाठी जाताना भीती वाटत आहे.
तसेच देसवडे परिसरासह इतर भागात १५ ते २० बिबटे मोकाट फिरताना दिसत आहे. काही शेतकऱ्यांना अक्षरशः टोळीने चार ते पाच बिबटे फिरताना दिसले. त्यामुळे शेतातील पिके सोडून देण्याची वेळ आली आहे. बिबट्यांचा वावर पाहता हल्ले वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बिबट्यांना तातडीने जेरबंद करण्यात यावे अन्यथा शेकडो शेतकऱ्यासह आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
तसेच या निवेदनातून पारनेर तालुक्यातील अतिसंवेदनशील गावांना संभाव्य बिबट्या आपत्ती प्रवण क्षेत्र घोषित करा, बिबट्यांची वाढती संख्या पहाता बिबट्यांची नसबंदी करण्यात यावी. बिबट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मानवांना १० लाख रुपयांची मदत मिळावी. स्वसंरक्षणासाठी बिबट्यांना मारण्याची परवानगी देण्यात यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी बाळशिराम पायमोडे, संतोष वाबळे, मनोज तामखडे, अन्सार पटेल, अरूण बेलकर, प्रविण खोडदे, रघुनाथ मांडगे, राजू रोकडे, राहुल गुंड आदी शेतकरी उपस्थित होते.





