नागपंचमी विशेष : सर्प विज्ञानाची गरज

– विठ्ठल वळसे पाटील
महाराष्ट्रात नागपंचमी सणाला नागाची मनोभावे पूजा केली जाते. या दिवशी, सापाची पूजा केल्याने कुटुंबाला संरक्षण मिळते, असे मानले जाते. आज नागपंचमी सण आहे. त्यानिमित्त सर्प विज्ञानाची गरज जाणून घेऊया.
शेतात उंदीर, घुशींमुळे पिकांची नासाडी होते. उंदीर, घुशी हे सापांचे भक्ष्य असल्याने शेतातील पिकांचे नैसर्गिकरित्या संरक्षणाचे काम साप करत असतात. म्हणून ते एक प्रकारे शेतकर्यांचे मित्र आहे. म्हणून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून पूजा केली जाते. अनेक धर्मात नागदेवतेला महत्त्व दिलेले आहे. संत तुकाराम महाराज सांगतात, कोणत्याही प्राण्याचा मत्सर न करता चित्त शुद्ध करावे. प्राण्यांना सुखी ठेवणे ही ईश्वराची पूजा आहे. ते पुढील अभांगातून सांगतात-
मारूं नये सर्प संतांचिये दृष्टी ।
होतील ते कष्टी व्यापकपणें ॥
आपल्याला साप, त्याच्या प्रजाती, विषारी, निम विषारी, बिन विषारी साप, त्यांचे अधिवास, प्रजनन काळ, दक्षता व उपचार यासंबंधी माहिती असणे गरजेचे आहे. पूर्वी शेती बारमाही नसल्याने अनेक साप हे झाडेझुडपे, डोंगर, माळरानावर असत. कारण त्यांना तिथे त्यांचे भक्ष्य सहज मिळत असे. मात्र, आज बारमाही शेती, नगदी पिके व धरणांच्या पाटावाटे येणारे पाणी यामुळे सतत ओलावा मिळाल्याने त्यांना मोठे आश्रयस्थान प्राप्त झाले आहे. अशा कारणाने सापाचा वावर वाढल्याने सर्पदंश वाढू लागले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, वर्ष 2023 मध्ये भारतात सर्पदंशामुळे जवळपास 50 हजार मृत्यू झाले आहेत. पावसाळी हंगाम हा त्यांचा प्रजनन काळ असतो.
साप म्हटलं की प्रथम जाणवते ती सापाबद्दलची भीती. ही भीती नाहीशी करायची असेल तर विषारी, निम विषारी, बिन विषारी साप ओळखता आले पाहिजे. बर्याचदा अज्ञानातूनच साप मारले जातात. निसर्गातील इतर घटकांप्रमाणे साप परिसंस्थेचे भाग आहेत. त्यांचे अस्तित्व नष्ट होऊ नये यासाठी त्यांच्या विषयीचे सर्प विज्ञान जाणून घेतले पाहिजे. जगात जवळपास 2700 प्रकारचे साप तर भारतात 340 जाती सापडतात, त्यात 69 जाती विषारी आहे. महाराष्ट्रात 52 जातीत जवळपास 12 साप विषारी आहेत.
विषारी साप- नाग, मण्यार, घोणस, फुरसे, पोवळा, चापडा, समुद्र साप, निमविषारी साप- मांजर्या, हरणटोळ, उडता सोनसर्प, भारतीय अंडीखाऊ साप, श्वानमुखी, झिलान, जाडरेती सर्प, तर बिनविषारी धामण, धूळनागीण, मांडूळ, अजगर, तस्कर, खवल्या, गवत्या, पानदिवड, कवड्या, नानेटी, डुरक्या घोणस, विंचू वाळा, चिगांग नायकुळ, कुकरी, कृष्णशीर्ष, शेवाळी वनसर्प, रजतबन्सी होत. अॅनाकोंडाबाबत जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. हा साप दक्षिण अमेरिकेत आढळतो. तो बिन विषारी व निशाचर आहे. तो पाण्यात राहतो. जवळपास 250 किलो तर 30 फुटापर्यंत लांबीचा असतो. तो भारतात आढळत नाही.
साप उंदरांची बिळे, विट दगडाचे ढीग, अडगळीच्या जागा, काही साप खारफुटीची जागी, खेकड्यांची बिळे, काही साप झाडावर, गवतात आढळतात. उंदीर, घुशी, सरडे, पाली, बेडूक, पक्ष्यांची अंडी, छोटे कीटक तर समुद्री साप मासे खातात. तर अजगरासारखे साप ससे, हरणाची पिल्ले, डुक्कर, घुशी, कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या त्याचे भक्ष्य असते. नागराज (किंग कोब्रा) हा विषारी साप 14 ते 15 फुटापर्यंत लांब असतो. सहसा घनदाट अरण्यात आढळतो. भक्ष्य म्हणून लहान विषारी, बिनविषारी सापांनासुद्धा खातो. नागाच्या 7 जाती भारतात आहेत. नाग हा विषारी जातीचा साप आहे. नाग फणा काढतो तेव्हा डोक्याच्या मागील बाजूस 10 असा आकडा दिसतो.
मण्यार हा विषारी साप उंदीर, सरडे, पाली तसेच इतर लहान सापही खातो. निशाचर असल्याने रात्री दिसतो. अंगावर निळसर काळ्या रंगाचे आडवे पट्टे तर डोक्यावर पांढरे ठिपके असतात. 5 फुटापर्यंत लांब असतो. याच्या भारतात 8 जाती सापडतात. विषारी घोणसचा गर्द पिवळा तपकिरी रंग असतो आणि लांबट गोल शरीर असते.
या ठिपक्यांच्या शरीराच्या डावीकडे उजवीकडे डोक्यापासून शेपटीपर्यंत तीन माळा असतात. भारतात याच्या 2 जाती सापडतात. चिडल्यावर कुकरच्या शिट्टीसारखा आवाज करतो. विषारी फुरसे साप तपकिरी लाल रंगावर पांढरी नक्षीदार, डोक्यावर बाणाकृती पांढरी नक्षी असते. शरीरावर करवतीच्या दातासारखे खवले असतात. विंचू हे त्याचे भक्ष्य आहे. याच्या 3 जाती भारतात सापडतात. लांबी सव्वादोन फुटापर्यंत असते. तो घोणसप्रमाणे जाडजूड असतो.
नाग, मण्यारचे विष नुरोटॉक्झिक असल्याने मज्जासंस्थेवर परिणाम होतो. दंश झालेल्या ठिकाणी जळजळ, तीव्र वेदना, अंग जड होणे, हातपाय गळून जाणे, डोळ्याच्या पापण्या आपोआप मिटणे, झोप आल्यासारखे होणे, मळमळ, उलट्या, जीभ जड होणे, पोट सांधे दुखू लागणे, श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होतो.
घोणस व फुरसे यांचे विष हिमोटॉक्झिक असल्याने रक्तावर परिणाम होतो. दंशाच्या ठिकाणी सूज येते व वाढत जाते. जखम होऊन लालसर हिरवट पाणी निघते. हिरड्या, नाक, कान, लघवीतून रक्त यायला लागते. कोणत्याही सापाचा दंश झाल्यास बाधित व्यक्तीचे मनोबल खचू न देता धीर देणे, रक्ताभिसरण वेगाने होऊ नये यासाठी त्यास जास्त चालू, बोलू देऊ नये. नाग, मण्यारचा दंश असल्यास आवळ पट्टीने रक्तपुरवठा बंद होईल अशी बांधू नये. जखम पाण्याने धुऊन जंतूनाशकाने स्वच्छ करावी. खाण्यापिण्यास देऊ नये. दंश झालेल्या ठिकाणी कापू नये. अति तातडीने रुग्णास दवाखान्यात न्यावे. रुग्णांचे प्राण वाचवणे महत्त्वाचे आहे.
काही दक्षता घेणे गरजेचे आहे. जिथे उंदीर, पाल, सरडे, बेडूक, घुशी असतात अशा ठिकाणी साप येतात. त्यामुळे अंगण व घराची स्वच्छता राखावी. अडगळ ठेवू नये. रात्री फिरताना काठी आपटत चालावे. काठीच्या कंपणाने साप बाजूला सरकतात. भ्रमंती करताना टोपी, पायात बूट घालावेत. घराजवळ अंडी देणारे पशू, पक्षी नसावे. शेतात काम करताना गनबूट वापरावेत. शेतातील घरात झोपताना भिंतीला खेटून झोपू नये. साप दिसल्यास विनाकारण डिवचू नये. माहिती असल्याशिवाय पकडू नये, मारू नये. सर्पमित्रांना तातडीने माहिती द्यावे. ते योग्यरीतीने पकडून जंगलात सोडतील.
सापांबाबत काही अंधश्रद्धा व भाकड कथा रूढ आहेत. जसे की, सापाला तीन फुटांपेक्षा पुढील अंधुक दिसते. त्यास कृष्णधवल दिसते. हल्ला होत असल्यास तो बचाव करत निघून जातो किंवा प्रतिहल्ला करतो. साप दूध पितो. पुंगीच्या तालावर डोलतो. बदला घेतो. नागाच्या डोक्यावर नागमणी असतो. 100 वर्षे जगलेला साप मानवी अवतार घेतो. धामण गायी-म्हशीच्या पायाला विळखा घालून दूध पिते. सापांच्या अंगावर केस असतात. साप पुरातन धनाचे रक्षण करतो. सापाचे विष मंत्राने उतरवता येते. साप पकडण्याचे मंत्र असतात. गर्भवती स्त्री व साप यांची नजरानजर झाल्याने जन्माला येणारे मूल जीभ चाटणारे बनते.
साप हा वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या अनुसूचित येतात. साप पकडून घरी ठेवणे, त्यांचे प्रदर्शन मांडणे, सोशल मीडियावर प्रसारित करणे असे अनुचित प्रकार केल्यास दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. सर्पमित्रांना फ्रंटलाइन वर्कर्स दर्जा व 10 लाख रुपयांचा विमा देण्यात आला आहे. सर्पमित्र म्हणून त्यांची नोंद जिल्हा वन विभाग कार्यलयात करता येते.





