Bihar Elections 2025 : “माझे एकच स्वप्न.. बिहारला नंबर वन बनवणे…” – तेजस्वी यादव

Tejashwi Yadav । Bihar Elections 2025 – आमचे सरकार लोकांच्या तक्रारी ऐकेल आणि त्यांना परवडणारी औषधे आणि नोकऱ्या देईल. आम्ही भ्रष्टाचारमुक्त सरकार चालवू आणि बिहारला देशातले क्रमांक एकचे राज्य बनवू, असे प्रतिपादन राष्ट्रीय जनता दलाचे आणि इंडिया आघाडीने बिहारच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवडलेले नेते तेजस्वी यादव यांनी केले. बख्तियारपूर येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
यादव म्हणाले की, माझे एकच स्वप्न आहे, बिहारला नंबर वन बनवणे… बिहारला असे सरकार हवे आहे जे शिक्षण, आरोग्यसेवा, रोजगार, सिंचन यावर काम करेल, कृती करेल आणि लोकांचे ऐकेल. आम्हाला असा बिहार हवा आहे जिथे कोणालाही उपचार किंवा नोकरीसाठी इतरत्र जावे लागणार नाही.
जर बिहारमध्ये इंडिया आघाडी सत्तेत आली तर मुख्यमंत्री म्हणून मी खात्री करेन की, राज्यात कोणताही गुन्हा केला जाणार नाही. मी भ्रष्टाचारमुक्त सरकार आणेन. जर सत्ताधारी आघाडी पुन्हा सत्तेत आली तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवले जाणार नाही. विद्यमान सरकार भ्रष्ट नेते आणि गुन्हेगारांना संरक्षण देत आहे.
एक बिहारी म्हणून, मला दुःख होत आहे की, माझे राज्य गरीब आहे आणि बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी कारवाया वाढत आहेत. बिहारमध्ये २० वर्षे एनडीएचे सरकार आणि केंद्रात ११ वर्षे असूनही, राज्याचे दरडोई उत्पन्न सर्वात कमी आहे आणि शेतकरी गरीबच आहेत, असेही ते शेवटी म्हणाले.





