Kriti Sanon : “माझी मुलंही असे कपडे घालतात पण…”; क्रिती सनॉनच्या जाहिरातीवर प्रियांका चोप्राच्या आईचा खोचक टोला
क्रिती सनॉनने यापूर्वी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडताना रक्षाबंधनाचा अर्थ कपड्यांपेक्षा नात्यातील प्रेम आणि भावनांमध्ये आहे, असे म्हटले होते

Kriti Sanon : अभिनेत्री क्रिती सनॉनच्या रक्षाबंधनाच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद अद्याप चर्चेत आहे. जाहिरातीतील तिच्या पोशाखावरून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी रक्षाबंधनासारख्या पारंपरिक सणाच्या जाहिरातीसाठी हा पोशाख योग्य नसल्याचे म्हटले. तर क्रितीने महिलांच्या कपड्यांवरून त्यांच्या संस्कृती आणि संस्कारांचे मूल्यमापन करण्याला विरोध केला.
आता या वादात अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांच्या आई मधू चोप्रा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात माध्यमांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी महिलांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा आदर करताना प्रसंग आणि वातावरणाचे भान ठेवणेही महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले.
‘माय बॉडी, माय चॉइस’ ही भूमिका योग्य आहे; मात्र त्यासोबत स्वाभिमान, प्रतिष्ठा आणि इतरांच्या मूल्यांचा आदर असायला हवा, असे मधू चोप्रा यांनी सांगितले. एखादा पोशाख एका ठिकाणी योग्य वाटू शकतो, पण प्रत्येक प्रसंगाला तोच निकष लागू करता येत नाही, माफ करा पण माझ्या मुलांनीही आधुनिक किंवा असे कपडे घातले आहेत, मात्र कामासाठी किंवा आवडीनुसार कपडे निवडताना प्रसंग आणि वातावरणाचा विचार केला जातो,” असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, क्रिती सनॉनने यापूर्वी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडताना रक्षाबंधनाचा अर्थ कपड्यांपेक्षा नात्यातील प्रेम आणि भावनांमध्ये आहे, असे म्हटले होते. महिलांनी काय घालावे, यावरून त्यांच्या संस्कृतीचा निर्णय घेण्याची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचेही तिने सांगितले.
या वादानंतर संबंधित GIVA जाहिरात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आली. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांचा आदर करण्याची भूमिका कायम असल्याचे ब्रँडकडून स्पष्ट करण्यात आले. जाहिरातीमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर तो आपला हेतू नव्हता, असेही ब्रँडने म्हटले. त्यामुळे महिलांचे कपड्यांबाबतचे स्वातंत्र्य विरुद्ध पारंपरिक सणांचे भान, या मुद्द्यावर सोशल मीडियावर पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगली आहे.






