Tukaram Mundhe : जाणूनबुजून शाहरुख, अजय आणि टायगर श्रॉफला टार्गेट केलं? तुकाराम मुंढे अखेर स्पष्टच बोलले….
जाहिरातींमध्ये प्रसिद्ध सेलिब्रिटींना ब्रँडचा चेहरा बनवलं जातं. त्यामुळे जाहिरात पाहणाऱ्या ग्राहकांच्या मनात संबंधित ब्रँडची ओळख आणि त्याच्याशी जोडलेलं प्रतिबंधित उत्पादन यांच्यात संबंध निर्माण होतो.

Tukaram Mundhe : बॉलिवूडच्या पडद्यावर कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ सध्या एका जाहिरातीमुळे कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ‘विमल इलायची’च्या जाहिरातीप्रकरणी या तिन्ही बड्या कलाकारांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर मोठी खळबळ उडाली.
‘विमल’ कंपनीवर थेट कारवाई करण्याऐवजी देशातील आघाडीच्या कलाकारांनाच नोटीस का? सेलिब्रिटींना प्रसिद्धीसाठी सॉफ्ट टार्गेट केलं जातंय का? असा सवालही उपस्थित झाला. मात्र, आता या सर्व प्रश्नांवर FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. “प्रसिद्ध सेलिब्रिटींना लक्ष्य करण्याचा FDAचा कोणताही हेतू नाही,” असं सांगत त्यांनी कारवाईमागचा कायदेशीर आधार आणि सेलिब्रिटींची जबाबदारी स्पष्ट केली आहे.
तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं की, या प्रकरणात केवळ शाहरुख खान, अजय देवगण किंवा टायगर श्रॉफ यांनाच लक्ष्य करण्यात आलेलं नाही. उत्पादक आणि विक्रेत्यांवरही कारवाई सुरू आहे आणि जाहिरातीत सहभागी असलेले सेलिब्रिटी हे या संपूर्ण साखळीतील एक महत्त्वाचा दुवा आहेत, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे कारवाईचा उद्देश प्रसिद्ध चेहरे गाठून प्रसिद्धी मिळवणे हा नसून जाहिरातीच्या माध्यमातून नियमांचं उल्लंघन होत आहे का, हे तपासणं हा आहे.
सेलिब्रिटींचीही जबाबदारी का?
अन्न उत्पादनांच्या जाहिरातींबाबत FSSAIच्या Food Safety and Standards (Advertising and Claims) Regulations, 2018 मध्ये जाहिराती आणि दाव्यांसाठी नियम निश्चित करण्यात आले आहेत. जाहिरातीतील दावे सत्य, स्पष्ट, अर्थपूर्ण आणि ग्राहकांची दिशाभूल न करणारे असावेत, अशी तरतूद आहे.
याच नियमांचा आधार घेत मुंढे यांनी सांगितलं की, एखाद्या उत्पादनाचं समर्थन करणाऱ्या सेलिब्रिटीनेही त्या जाहिरातीतील दावा आणि त्यामागील उत्पादनाबाबत आवश्यक काळजी घेणं अपेक्षित आहे. “तुम्ही ज्या गोष्टीचा प्रचार करता, त्याबाबत केलेला दावा सत्य आणि अचूक असला पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘सरोगेट जाहिराती’वर FDAचा आक्षेप
या प्रकरणातील मुख्य मुद्दा म्हणजे सरोगेट जाहिरात. ‘विमल इलायची’च्या जाहिरातीच्या माध्यमातून प्रत्यक्षात ‘विमल पान मसाला’ ब्रँडची अप्रत्यक्ष जाहिरात केली जात आहे का, याची FDAकडून चौकशी केली जात आहे. महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या उत्पादनाचा अशा अप्रत्यक्ष पद्धतीने प्रचार करता येणार नाही, अशी FDAची भूमिका आहे. याच कारणामुळे या जाहिरातीवर आक्षेप घेण्यात आला आहे.
मुंढे यांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या कंपनीने उत्पादन महाराष्ट्राबाहेर तयार केलं किंवा विकलं म्हणून त्याला महाराष्ट्रात त्याच उत्पादनाचा अप्रत्यक्ष प्रचार करण्याची मुभा मिळत नाही. “उत्पादन राज्याबाहेर होतं, याचा अर्थ असा नाही की त्याचा प्रचार महाराष्ट्रात करता येईल,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
‘पान मसाला ब्रँडचा हा नेहमीचा फॉर्म्युला’
पान मसाला क्षेत्रातील अनेक ब्रँड प्रत्यक्ष उत्पादनाची जाहिरात करण्याऐवजी इलायची, माउथ फ्रेशनर किंवा तत्सम उत्पादनांच्या नावाखाली जाहिराती करत असल्याचं मुंढे यांनी नमूद केलं. अशा जाहिरातींमध्ये प्रसिद्ध सेलिब्रिटींना ब्रँडचा चेहरा बनवलं जातं. त्यामुळे जाहिरात पाहणाऱ्या ग्राहकांच्या मनात संबंधित ब्रँडची ओळख आणि त्याच्याशी जोडलेलं प्रतिबंधित उत्पादन यांच्यात संबंध निर्माण होतो का, हा FDAच्या तपासाचा महत्त्वाचा भाग आहे.
या प्रकरणात नोटिशीला समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पुढील कायदेशीर कारवाई होऊ शकते. तुकाराम मुंढे यांनी नियमांचं उल्लंघन सिद्ध झाल्यास १० लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, तसेच जाहिरात मागे घेण्यासह इतर कारवाईचीही तरतूद असल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना FDAने या जाहिरातीसंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागण्यात आलं आहे. या नोटिशींनंतर आता प्रकरण केवळ बॉलिवूडपुरतं राहिलेलं नसून सेलिब्रिटी जाहिरातींमधील जबाबदारी, सरोगेट जाहिरात आणि ग्राहकांची दिशाभूल या तीनही मुद्द्यांवर मोठी चर्चा सुरू झाली आहे.






