Mutha River Flood: मुठा नदीला पूर! खडकवासलातून २७ हजार क्युसेकने विसर्ग; सिंहगड रस्त्यावरील सोसायट्यांमध्ये शिरले पाणी
Mutha River Flood: खडकवासला धरण १०० टक्के भरल्याने बुधवारी पहाटेपासून विसर्ग सुरू; पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे नदीने रौद्ररूप धारण केले.

Mutha River Flood : खडकवासला धरणातील विसर्गामुळे शिवणे, सिंहगड रस्ता परिसरातील एकता नगरी, रजपूत झोपडपट्टी तसेच पुलाची वाडी येथील भाग पाण्याखाली गेला. तसेच शहराच्या मध्यवर्ती भागातील भिडे पूल पाण्याखाली गेला, तर शिवणे- नांदेड सिटीला जोडणारा पूलही वाहतुकीसाठी बंद करावा लागला. खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने बुधवारी पहाटे दोन वाजल्यापासून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू केला.
पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे काही तासांतच हा विसर्ग वाढवून तब्बल २७ हजार क्यूसेक करण्यात आला. नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे डेक्कन परिसरात नदीपात्रात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या दोन क्रेन पाण्यात अडकल्या. तसेच नदीपात्रातील काही वाहनेही पुराच्या पाण्यात अडकून पडली. खबरदारी म्हणून मंगळवारी रात्रीपासून नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता.
बुधवारी सकाळी पेठांमधील अनेक भागांत वाहतूक कोंडी झाली. धरणाच्या पुढील भागातही मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली होती. पूरग्रस्त भागांमध्ये कोणताही अपघात होऊ नये, यासाठी महावितरणकडून तत्काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला. पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता पाण्याचा विसर्ग १८ हजार २७१ करण्यात आला.
एकता नगरीला फटका
खडकवासला धरणातून यंदा प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी परिसरातील तीन ते चार सोसायट्यांमध्ये पाणी घुसले. त्यामध्ये जलपूजन, शारदा सरोवर, द्वारका या सोसायट्यांसह काही बैठ्या घरांचाही समावेश आहे.दोन वर्षांपूर्वी येथे पूरस्थिती निर्माण झाल्याने धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात होताच पालिकेच्या सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय,
आपत्ती व्यवस्थापन पथकाने पहाटे साडेतीन वाजल्यापासून नागरिकांना सतर्क केले. तसेच वाहने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन केले. क्षेत्रीय अधिकारी प्रज्ञा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दल, आरोग्य, पथ आणि ड्रेनेज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबी, फ्लड बॅरिअरच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले.
५० हून अधिक घरांत पाणी
मुठा नदीतील पाण्याचा विसर्ग वाढल्याने एरंडवणे येथील रजपूत झोपडपट्टीतील १५ ते २० घरांमध्ये पाणी शिरले. नागरिकांना पालिकेने सुरक्षित स्थळी हलवले. याशिवाय, डेक्कन मेट्रो स्थानकाखालील रस्त्यावर साहित्य विक्री करणाऱ्या कुटुंबांच्या पत्राशेडमध्येही पाणी घुसले. त्यांनाही पालिकेने आपत्ती व्यवस्थापनासाठी निश्चित केलेल्या निवारा केंद्रांमध्ये हलवले. कोंढवा-धावडे परिसरातील करिश्मा रेसिडेन्सी , वारजे तपोधाम या सोसायटीतही पाणी घुसले होते.





