पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, जिल्हा प्रशासनाने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्ती केली होती. निवडणूक निकाल लागून २० दिवस झाले तरी अनेक कर्मचारी आपल्या मूळच्या कामाच्या ठिकाणी हजर झालेले नाहीत तसेच हजर झालेल्या कर्मचाऱ्यांनी आपण पुन्हा महापालिकेत रुजू झाल्याचे विभाग प्रमुख अथवा कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्या नियोजनाची जबाबदारी असलेल्या सामान्य प्रशासन विभागास कळविले नाही. त्यामुळे कर्मचारी परत आल्याची नोंदच नसल्याने सामान्य प्रशासनाने विभागाने सर्व विभाग प्रमुखांना पत्र पाठवित निवडणूक कामकाजासाठी गेलेले कर्मचारी कामावर रूजू झाले की नाही, याची माहिती मागविण्यात आली आहे. समन्वयाचा अभाव… लोकसभा निवडणूकीपूर्वी जिल्हा प्रशासनाने महापालिकेकडे निवडणुकीसाठी उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती मागविली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून सामान्य प्रशासन विभागास सूचना न देताच थेट विभाग प्रमुखांनाच कर्मचाऱ्यांच्या नावाच्या याद्या पाठविल्या त्यानुसार, या विभागांनीही तत्काळ आपल्याकडील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी पाठविले. मात्र, अनेक कर्मचारी गेलेच नसल्याने जिल्हा प्रशासनाने पत्र पाठवित नाराजी व्यक्त केली. त्यावेळी अतिरिक्त आयुक्तांनीही तत्काळ या कर्मचाऱ्यांनी निवडणूक कामास रूजू होण्याचे आदेश दिले. मात्र, नेमके किती कर्मचारी रुजू झाले याची माहिती सामान्य प्रशासन विभागालाच नव्हती तर या विभागाने अनेक सेवा निवृत्त तसेच मयत कर्मचाऱ्यांची नावेही कळविली. त्यानंतर आपली चूक लक्षात येताच सामान्य प्रशासन विभागाने प्रत्येक विभागाला आपले किती कर्मचारी निवडणूक कामाला गेले आहेत याची माहिती संकलीत केली. त्यानंतर् आता निवडणूक प्रक्रीया संपली तरी किती कर्मचारी परत आले याची माहितीच नसल्याने पुन्हा एक पत्र पाठवित सर्वांकडून माहिती मागविण्यात आली आहे. ही माहिती मागविली… सामान्य प्रशासन विभागाकडून विभाग प्रमुखांकडे मागविण्यात आलेल्या माहिती मध्ये सामान्य प्रशासन विभागाने निवडणूक कामासाठी किती कर्मचारी गेले ? निवडणूक झाल्यानंतर खात्याकडे कामावर पुन्हा रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांची संख़्या किती ? कामावर आलेलेच नाहीत, अशा कर्मचाऱ्यांची संख्या किती तसेच त्यांचे नाव आणि हुद्दा काय ? ही माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.