Thergaon Ghat : पालिकेची ‘जोरदार’ तयारी कागदावरच; थेरगाव विसर्जन घाटावर हौद कोरडा!
Thergaon Ghat : सकाळी सातपासून भाविकांची गर्दी तब्बल अकरा वाजेपर्यंत पाण्याची प्रतीक्षा

पिंपरी – गणेश विसर्जनासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने जय्यत तयारी केल्याचा दावा केला असला, तरी थेरगाव येथील विसर्जन घाटावर या तयारीचा अक्षरशः फज्जा उडाल्याचे चित्र शुक्रवारी पहायला मिळाले.
विसर्जनासाठी उभारलेल्या हौदात सकाळी अकरा वाजेपर्यंत पाणीच नसल्याने गणेश भक्तांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. महापालिकेच्या या गलथान कारभारामुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
गणेश विसर्जनासाठी काही भाविक सकाळच्या सुमारासच घाटावर येतात. गावाकडे जाणे, नोकरी-व्यवसायाचे काम किंवा कुटुंबातील परंपरेनुसार सकाळीच गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याची अनेकांची प्रथा आहे. त्यामुळे थेरगाव विसर्जन घाटावर सकाळी सात वाजल्यापासूनच भाविकांची वर्दळ सुरू झाली होती. मात्र, विसर्जनासाठी महापालिकेने तयार केलेल्या हौदात पाणी नसल्याचे भाविकांच्या निदर्शनास आले.
पाणी कधी येणार, याबाबत घाटावरील महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता, ‘टँकर येत आहे’, ‘थोड्याच वेळात पाणी सोडण्यात येईल’, अशी उत्तरे देण्यात येत होती. मात्र, वेळ वाढत गेली तरी पाण्याचा पत्ता नव्हता. अखेर तब्बल अकराच्या सुमारास टँकर घाटावर दाखल झाला आणि हौदात पाणी सोडण्यात आले.
त्यानंतर भाविकांना विसर्जन करता आले. विशेष म्हणजे, पर्यावरण संवर्धनाचे कारण पुढे करत नदीपात्रात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेने पर्यायी विसर्जन हौदांची पुरेशी व्यवस्था करणे अपेक्षित होते. मात्र, हौदातच पाणी उपलब्ध नसल्याने भाविकांसमोर मूर्तीचे विधिवत विसर्जन कुठे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला.
विसर्जनाच्या दिवशीच हौदात पाणी भरण्याचे नियोजन महापालिकेला करता आले नाही, तर ‘जोरदार तयारी’ नेमकी कशासाठी, असा सवाल संतप्त गणेश भक्तांकडून उपस्थित करण्यात आला.
Sangli : डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप





