Sangli : डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप
Sangli : तब्बल साडे ३२ तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीनंतर मिरज शहरातील गणेशोत्सवाची सांगता झाली.

सांगली : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तब्बल साडे ३२ तास मिरज शहरातील ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तात व्यस्त राहिल्यानंतर मिरज शहर पोलीस ठाण्याच्या गणरायाला शनिवारी सायंकाळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात भावपूर्ण निरोप देण्यात आला. डॉल्बी आणि कर्णकर्कश आवाजाला फाटा देत ढोल-ताशा पथक व नाशिक ढोलाच्या तालावर पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी उत्साहात सहभाग घेतला. पोलिसांच्या या उपक्रमातून युवा पिढीसमोर पारंपरिक वाद्यांचा आणि शिस्तबद्ध गणेशोत्सवाचा आदर्श निर्माण झाला.
मिरज शहरातील ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पडावी, यासाठी सांगली जिल्हा पोलीस दलाने यंदाही नियोजनबद्ध पद्धतीने चोख बंदोबस्त ठेवला होता. मिरवणुकीच्या मार्गावर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकारी, अंमलदार, वाहतूक शाखा, गुन्हे शाखा तसेच विविध पथकांनी अहोरात्र कर्तव्य बजावले. हजारो गणेशभक्तांच्या गर्दीत वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पोलिसांनी समर्थपणे पेलले.
तब्बल साडे ३२ तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीनंतर मिरज शहरातील गणेशोत्सवाची सांगता झाली. या काळात सलग अनेक तास कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी स्वतःचा उत्सव बाजूला ठेवून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी सतत दक्षता ठेवली. परिणामी मिरजेची ऐतिहासिक विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.
विसर्जन मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर मिरज शहर पोलीस ठाण्याच्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली. यावेळी मात्र पोलिसांच्या चेहऱ्यावर दिवसभराच्या कर्तव्याचा थकवा नव्हता, तर आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा उत्साह होता. ढोल-ताशा आणि नाशिक ढोलाच्या पारंपरिक तालावर पोलीस अधिकारी व अंमलदारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे, पोलीस निरीक्षक किरण चौगले, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत तिप्पे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदारांनी ढोल-ताशांच्या तालावर चांगलाच ठेका धरला. कर्तव्य बजावताना शिस्त, तर गणरायाला निरोप देताना उत्साह आणि भक्तिभाव, असे पोलिसांचे वेगळेच रूप यावेळी पाहायला मिळाले.
विशेष म्हणजे, गणेशोत्सवात वाढत चाललेल्या डॉल्बी संस्कृतीला फाटा देत पोलिसांनी आपल्या गणरायाच्या विसर्जनासाठी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले. ढोल-ताशा आणि नाशिक ढोलाच्या तालावर निघालेली ही मिरवणूक पाहताना उपस्थित नागरिक आणि गणेशभक्तांनीही पोलिसांच्या या भूमिकेचे कौतुक केले. उत्सवाचा आनंद घेतानाच ध्वनिप्रदूषण टाळून पारंपरिक संस्कृती जपता येते, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
गणेशोत्सव काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरून दिवसरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनी अखेर आपल्या पोलीस ठाण्याच्या गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला. त्यामुळे मिरज शहर पोलीस ठाण्याचा हा विसर्जन सोहळा केवळ गणरायाच्या निरोपाचा नव्हे, तर कर्तव्य, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि पारंपरिक संस्कृतीचा सुंदर संगम ठरला.
मिरजच्या ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीत लाखो गणेशभक्तांच्या गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था आणि सुरक्षेची जबाबदारी पार पाडत पोलिसांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे यंदाचा गणेशोत्सव शांततेत पार पडला. नागरिकांच्या उत्सवासाठी स्वतःचा वेळ आणि आराम बाजूला ठेवणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या या कर्तव्यनिष्ठेला मिरजकरांकडूनही सलाम करण्यात आला.





