Pune : वाघोली बाह्यवळण रस्त्यासाठी 40 कोटीची तरतूद करावी; पालकमंत्र्यांचे मनपा प्रशासनाला आदेश

वाघोली :- पुणे मनपात समाविष्ट झालेल्या वाघोलीची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी वाघोली बाह्यवळण रस्त्यासाठी 40 कोटी रुपयांची निधीची तरतूद करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे मनपा प्रशासनाला दिले आहेत.
वाघोली येथील विकास कामांच्या बाबतीत पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पुणे महानगरपालिकेचे सर्व प्रशासकीय अधिकारी, पी एम आर डी ए चे सर्व अधिकारी, महावितरणचे अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, वाघोली चे माजी उपसरपंच संदीप सातव, माजी उपसरपंच महेंद्र भाडळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाघोली मधील महावितरण चे सब स्टेशन उभारणीसाठी पी एम आर डी एन ए ने जागा उपलब्ध करून द्यावी, वाघोली मध्ये उपअभियंता कार्यालय देखील मंजूर करण्यात येईल असे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले.
“वाघोली मधील पिण्याचे पाणी, सांडपाणी, अंतर्गत रस्ते, महावितरण सब स्टेशन, कचरा प्रश्न आदी समस्यांबाबत पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रशासनाला आदेश देऊन वाघोलीकरांचा विश्वास सार्थ ठरवला आहे.
– रामभाऊ दाभाडे(माजी जिल्हा परिषद सदस्य)
वाघोलीकरांसाठी पाण्याची योजना पीएमआरडीएने दोन महिन्यात तातडीने पूर्ण करावी याबाबत पीएमआरडीए आयुक्त यांना आदेश देण्यात आले. वाघोली मध्ये सतत होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत पाटील यांनी सूचना केल्या.
“वाघोली मधील विविध विकास कामांच्या बाबतीत विविध विभागांची संयुक्त बैठक घेऊन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत याच निर्णयाबद्दल पालकमंत्र्यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.
– संदीप सातव(माजी उपसरपंच वाघोली)
वाघोली मधील पथदिवे सुरू करण्याबाबत पुणे महानगरपालिकेला सूचना करण्यात आल्या. तर लोहगाव ते वाघोली ते केसनंद ते राहू रोड 10 मी. रस्ता करण्याबाबत राज्य सरकार कडून मंजुरी देण्यात येणार आहे असल्याचे पाटील यांनी सांगितले.
वाघोलीकरांसाठी प्रदीप कंदांचा पुढाकार …
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाघोलीकरांच्या प्रश्नांना पालकमंत्र्यांच्या दारी मांडून त्याची सोडवणूक करून मोकळी वाट करून दिल्याने प्रदीप कंदांच्या या पुढाकाराची वाघोलीत सध्या मोठी चर्चा होऊ लागली आहे.
वाघोली मधील ग्रामपंचायत सेवकांना पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनावरती वर्ग करून घेण्यात येणार आहे. तसेच वाघोलीत पुणे महानगरपालिका कार्यालय मध्ये उच्चशिक्षित संपर्क अधिकाऱ्याची नेमणूक त्वरित करण्यात यावी. वाघोली मधील प्रभू श्रीराम उद्यान वाघेश्वर उद्यान स्मशानभूमी या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे आदेश पालकमंत्री यांनी प्रशासनास दिले.





