Building Collapse: मुंबईमध्ये कोसळधार! मानखुर्दमध्ये चाळीचा भाग कोसळून 6 जणांचा मृत्यू
Building Collapse: मृतांमध्ये चार महिलांचा समावेश

Building Collapse: मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे झाडपडीच्या अनेक घटना घडल्या. कालही मुंबईत झाड कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. यानंतर आता मानखुर्दमध्ये चाळीचा भाग कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
संततधार पावसामुळे इमारतीचा भाग कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशमन दल, पोलिस, महापालिका आणि आपत्कालीन यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे.
नेमकी काय घटना घडली?
मानखुर्द मधील हनुमान मंदिरामागील जनता नगर परिसरात तळमजला अधिक तीन मजली चाळीच्या इमारतीचा काही भाग कोसळला. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. यामध्ये चार महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे.
प्राथमिक माहितीनुसार, चाळ क्रमांक ५ मधील दोन ते तीन घरांचा भाग कोसळला, ढिगाऱ्याखाली ४ ते ५ जण अडकल्याची भीती व्यक्त होत होती.
या दुर्घटनेत पाच जणांचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात तर एकाचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. तर या दुर्घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे, अशीही माहिती समोर येते आहे.
ही घटना घडली ती जागा जिल्हाधिकारी जागा असून त्याला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटीसही बजावण्यात आल्याचे समजते. मात्र, त्यानंतरही ही जागा रिकामी करण्यात आली नव्हती. कोसळलेल्या घराच्या तळमजल्यावर गोडाऊनही होते.
मुंबईतील मानखुर्द भागात एक घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. या प्रसंगात त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही त्यांनी म्हटले असून…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 6, 2026
मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत
दरम्यान, मुंबईतील मानखुर्द भागातील या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. या प्रसंगात त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही त्यांनी म्हटले असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली आहे.
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प
दुसरीकडे, पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील ‘कनेक्टिंग लिंक’ आणि ‘मिसिंग लिंक’च्या दरम्यान एक काँक्रीटचा पिलर कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर सततच्या मुसळधार पावसामुळे जुन्या महामार्गावर काही ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून हा मार्गही बंद करण्यात आला आहे.
हेही वाचा:





