Mumbai Rain : मुसळधार पावसात कर्तव्य बजावणाऱ्या मुंबई पोलिसांना सिद्धार्थ जाधवचा सॅल्युट; अभिनेत्याचा Video व्हायरल…
Siddharth Jadhav | Mumbai Police | Mumbai Rain : राजधानी मुंबईत कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बस आणि मुंबईची जीवनवाहीनी मानली जाणारी लोकलसेवाही विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. शहराच्या अनेक भागांत आजही म्हणजे सोमावारी पाऊस सुरू होता व अनेक ठिकाणी पाणी साचले होते.
हवामान खात्याकडून सोमवारी दिवसभर पावसाची शक्यता अगोदरच वर्तवण्यात आली होती. शहरात काल रात्री आठ वाजेपासून आज सकाळी आठ वाजेपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सामान्य नागरिकांचे चांगलेच हाल झाले आहेत. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण पट्ट्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान, या मुसळधार पावसातही मुंबई पोलीस त्यांचं कर्तव्य बजावताना दिसले. याच मुंबई पोलिसांना मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव याने सल्युट केलाय. मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे बरेच हाल होत आहेत. बऱ्याच रस्त्यांवर पाणी साचलं, रेल्वे रुळावर पाणी साचलं त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले आहेत.
मुंबईतल्या मुसळधार पावसातही मुंबई पोलीस मात्र त्यांच्या ड्युटीवर होते. याच ऑन ड्युटी पोलिसांसोबत सिद्धार्थने वेळ घालवला. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, गिरगांव चौपाटीवरील सिद्धार्थचा हा व्हिडीओ असल्याचं बोललं जात आहे.
आज (सोमवार) मुंबई पोलिसांची सिद्धार्थने इन्स्टास्टोरीवर भेट घेतल्यानंतरचे काही फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्याने मुंबई पोलिसांना टॅग करत ही सेल्फी शेअर केलेली आहे. मुंबई पोलिसांनी अभिनेत्यासोबतची सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर करत त्याचे आभार मानले आहेत.
सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थ मुंबई पोलिसांसोबत संवाद साधतानाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, अभिनेता सर्व पोलिस बांधवांची चौकशी करताना दिसत आहे. त्यानंतर अभिनेता त्यांच्यासोबत सेल्फी काढताना दिसत आहे. सध्या सिद्धार्थ जाधवच्या ह्या कृत्याचं कौतुक होत आहे.





