Mumbai Rain Alert Update : पावसाने दाणादाण, प्रवाशांना मनस्ताप…; मुसळधार पावसामुळे मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत

Mumbai Rain Alert Update : मुंबईत काल रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. तर मुसळधार पावसामुळे लोकल सेवा देखील ठप्प झाली आहे.
आजही सकाळपासून मुंबईत पाऊस सुरू असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी, मुंबईतील सर्व BMC, सरकारी आणि खाजगी शाळा आणि महाविद्यालयांना पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
आजही हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली असल्याने परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्रांसाठीचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. सखल भागात पाऊस बरसत असल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
अवघ्या सहा तासांच्या पावसात मुंबईची तुंबई झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर टीका होऊ लागली आहे. जोरदार पावसामुळे रेल्वे देखील रद्द झाल्या असून, प्रवासी नागरिकांचे चांगलेच हाल झाले आहेत. नाशिकच्या रेल्वे लेट झाल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.
कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस सकाळी सात वाजल्यापासून अंबरनाथ स्टेशन जवळ थांबून होती. अखेर चार तासानंतर कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस अंबरनाथ वरून मुंबईच्या दिशेने रवाना झाली. रेल्वे सेवा विस्कळित झाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय.
तर दुसरीकडे अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा अंधेरी सब वे देखील पाण्याखाली गेला असून सध्या अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सबवे मध्ये पाच फुटापर्यंत पाणी साचल्याचे सांगितलं जात आहे.





