Mumbai Rain Alert Update : मुसळधार पावसानं मुंबईकरांचे हाल.! दुबई-न्यूयॉर्कची उदाहरणं देत मुनगंटीवार म्हणतात….

Sudhir Mungantiwar। Mumbai Rain Alert Update | मुंबईत काल रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. तर मुसळधार पावसामुळे लोकल सेवा देखील ठप्प झाली आहे.
आजही सकाळपासून मुंबईत पाऊस सुरू असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी, मुंबईतील सर्व BMC, सरकारी आणि खाजगी शाळा आणि महाविद्यालयांना पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
आजही हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली असल्याने परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्रांसाठीचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. सखल भागात पाऊस बरसत असल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे.
अवघ्या सहा तासांच्या पावसात मुंबईची तुंबई झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर टीका होऊ लागली आहे. पालिका प्रशासनाने त्यांचं काम चोख न केल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याची टीका विरोधक आणि नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, यावर बोलताना राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पालिका प्रशासनाचा बचाव केला असल्याचं दिसून आलं आहे. मुंबईच्या सध्याच्या परिस्थितीवर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, “पाऊस थोडा असेल किंवा रिमझिम बरसत असेल तर असे प्रश्न निर्माण होत नाहीत.
सतत मुसळधार पाऊस पडतो तेव्हा अशी अडचण निर्माण होते. म्हणून मी मुंबई महापालिकेला दोष देत नाही. मुंबई महापालिकेला दोष द्यायचा असेल तर इतर ठिकाणीही पाणी साचतंय, त्यावरही बोलायला हवं. दुबईतील प्रशासन, न्यूयॉर्कमधील प्रशासन चांगलं काम करतं तरी देखील तिकडे पाणी साचतं.
चीनमध्ये चार दिवसांपूर्वी आठ फूट पाणी साचलं होतं. त्यामुळे या गोष्टींना दोष देण्याऐवजी काही सकारात्मक गोष्टी करायला हव्यात. आपण आपल्या शहरात आवश्यक त्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत.
१७,००० कोटी रुपयांच्या योजना पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने निविदा देखील काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील प्रश्न लवकर सुटतील. मुंबईसाठी १७ हजार कोटी रुपयांच्या योजना आणल्या आहेत. त्यातून आपण मुंबईला सर्व प्रश्नांमधून मुक्त करू.
मुंबईतील ९० टक्क्यांहून अधिक अडचणी यातून सोडवल्या जातील. परंतु, जेव्हा पाऊस अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात बरसतो तेव्हा असे प्रश्न निर्माण होतातच.’ असं देखील सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.





