आजपासून मुंबई-पुणे रेल्वेसेवा पूर्ववत

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबई आणि पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वेला बसला होता. दरम्यान, पावसामुळे मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु, आता आजपासून मुंबई पुणे रेल्वेसेवा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस आणि मुंबई पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्या आजपासून धावणार आहेत. मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी या गाड्या 16 ऑगस्टपर्यंत रद्द राहणार असल्याचे यापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. लांब पल्ल्याच्या विविध गाड्याही रद्द करण्यात आल्याने प्रवासी मेटाकुटीला आले होते. रेल्वेच्या मुंबई आणि पुणे विभागासह इतर ठिकाणी पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे गाड्या रद्द कराव्या लागत असल्याचे स्पष्टीकरण रेल्वेकडून देण्यात आले होते. मात्र, मुंबई-पुणे सेवा पूर्ववत झाल्याने आता प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.





