Mumbai Pune Bullet Train: पुणे ते मुंबई प्रवास फक्त ४८ मिनिटांत! बुलेट ट्रेनच्या ‘डीपीआर’ला मंजुरी; असा असणार रूट
Mumbai Pune Bullet Train: नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशनकडून मार्ग निश्चितीचे काम सुरू; शमशाबाद विमानतळाजवळ उभारणार ५०० एकरांचे भव्य हाय-स्पीड रेल हब.

Mumbai Pune Bullet Train – महाराष्ट्र आणि तेलंगणाला जोडणाऱ्या ६७१ किलोमीटर लांबीच्या मुंबई- पुणे- हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) पूर्ण झाला असून, त्याला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे जमीन संपादनाच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे दीड ते दोन लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सध्या मुंबई ते हैदराबाददरम्यान रेल्वे प्रवासासाठी १२ ते १५ तास लागतात.
मात्र, ताशी ३०० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या या बुलेट ट्रेनमुळे हा प्रवास अवघ्या ३ ते ३.५ तासांत पूर्ण होईल. याशिवाय मुंबई ते पुणे हे अंतर अवघ्या ४८ मिनिटांत पार करणे शक्य होणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन आणि महसूल प्रशासनाने या मार्गासाठी जमीन निश्चित करण्याचे काम सुरू केले आहे. या एकूण ६७१ किमीच्या मार्गापैकी ९३ किमीचा मार्ग तेलंगणा राज्यातून, तर उर्वरित मोठा हिस्सा महाराष्ट्र आणि कर्नाटकातून जाणार आहे.
हा कॉरिडॉअर मुंबई, नवी मुंबई, लोणावळा, पिंपरी-चिंचवड, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, कलबुर्गी (कर्नाटक), विकाराबाद आणि हैदराबाद यांना जोडेल. हैदराबादमधील शमशाबाद विमानतळाजवळ ५०० एकरांवर भव्य हाय-स्पीड रेल हब उभारण्याचे नियोजन आहे. यामुळे देशातील दोन मोठी आयटी हब थेट जोडली जाणार असून, सोलापूर, कलबुर्गीसारख्या शहरांत रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.





