बातमी मुंबई महापालिका निवडणुकीची: राज्य निवडणूक आयोगाकडून अत्यंत महत्वाची अपडेट समोर

BMC Election Update : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला लवकरच मुहूर्त मिळणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाने कंबर कसली असून, जोरदार तयारी केली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सगळ्यांचे लक्ष हे मुंबई महापालिकेकडे लागलेले आहे. अशातच मुंबई महापालिकेच्या निवडणुकी संदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून एक मोठी अपडेट समोर आली आहे.
मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, त्यानुसार आता राज्य निवडणूक आयोग ६ अॅाक्टोबर रोजी प्रभागांची अंतिम रचना जाहीर करणार आहे. या निवडणुकीसाठी १ जुलैपर्यंतीच मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. महापालिकेने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार या निवडणुकीत प्रक्रियेत 494 हरकती व सूचना दाखल झाल्या होत्या.
मुंबई महापालिकेची निवडणूक जानेवारीत?
यावर नुकतीच सुनावणी पार पडली. आता राज्य निवडणूक आयोग अंतिम प्रभाग रचना तयार करणार असून, 6 ऑक्टोबर रोजी प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला अधिक गती मिळणार आहे. प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आरक्षण जाहीर करण्यात येईल. त्यानंतर काही दिवसांतच मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर करण्यात येईल. अंदाजनुसार मुंबई महापालिकेची निवडणूक ही जानेवारी महिन्यात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
तयारीला आणि हालचालींना वेग
मुंबई महापालिकेची निवडणूक चांगलीच लक्षवेधी ठरणार आहे, याची कारण अनेक आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठी आव्हाने असणार आहे. त्यांचे राजकीय अस्तित्व पणाला लावणारी ही निवडणूक असणार आहे. यासोबत भाजप-शिंदे गटाकडूनही महापालिकेसाठी जोर लावला जाणार आहे. त्यादृष्टीने तयारीला आणि हालचालींना देखील वेग आला आहे.





