नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोग बिहारमध्ये विधानसभा निवडणूक घेण्यासाठी ॲक्शन मोडमध्ये आला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील आयोगाचे पथक ४ आणि ५ ऑक्टोबरला बिहारचा दौरा करणार आहे. त्यानंतर काही दिवसांत निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होईल. बिहारमधील विद्यमान विधानसभेची मुदत २२ नोव्हेंबरला समाप्त होईल. त्याआधी नवी विधानसभा अस्तित्वात येणे अनिवार्य आहे. त्या राज्यात नोव्हेंबरमध्येच निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधी आयोग संबंधित राज्याचा दौरा करतो. तशा प्रकारच्या दौऱ्यात निवडणूक तयारीचा आढावा घेतला जातो. त्या नियमित प्रथेनुसार कुमार यांच्या नेतृत्वाखालील पथक बिहारला भेट देईल. पुढील वर्षी पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांवर बिहारचा निकाल परिणाम करू शकतो. त्यामुळे बिहारमधील रणसंग्रामाचे राजकीय महत्व वाढले आहे. त्या राज्यात जेडीयू, भाजप आणि इतर पक्षांचा समावेश असणाऱ्या एनडीएची सत्ता आहे. सत्तारूढ आघाडीसमोर यावेळी राजद, कॉंग्रेस, डाव्या पक्षांचा समावेश असणारी विरोधकांची महाआघाडी तगडे आव्हान उभे करेल, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.