मुंबई पालिकेकडून तुर्कीच्या कंपनीचे कंत्राट रद्द! भाजप-उद्धवसेनेकडून कंपनीला विरोध

मुंबई – महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून चौपाट्यांवर बुडणाऱ्यांना वाचवण्यासाठी तुर्कीच्या कंपनीकडून उत्पादित रोबोटिक बचाव यंत्र (रोबोटिक वॉटर रेस्क्यू मशिन) तैनात केले जाणार होते.
मात्र, भारत-पाक संघर्षादरम्यान पाकला मदत करणाऱ्या तुर्कीवर अनेक स्तरांवर बहिष्कार टाकण्यात येत असतानाच महापालिकेने घेतलेल्या या निर्णयावर सर्व बाजूंनी टीकेची झोड उठली होती. त्यामुळे उशिरा जाग आलेल्या महापालिकेने या यंत्राचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि गोराई या चौपाट्यांवर सध्या १११ जीवरक्षक तैनात आहेत. या चौपाट्यांवर अनेकदा बुडून मृत्युमुखी पडल्याचे अनेक घटना घडल्या आहेत. यामुळेच जीवरक्षकांच्या जोडीला रोबोटिक बचाव यंत्राची मदत घेण्याचा निर्णय मुंबई अग्निशमन दलाने घेतला होता.
सहा रोबोट सहा चौपाट्यांवर तैनात करून ते रिमोट कंट्रोलने हाताळण्यात येणार होते. यासाठी महापालिकेने निविदा मागवल्या होत्या. त्यात दोन कंपन्यानी अर्ज सादर केले होते.
निवड झालेली कंपनी स्विर्त्झलँडची असून, तिच्याकडून दोन्ही बाजूंना वॉटर जेट व १० हजार एमएएच क्षमतेच्या रिचार्जेबल बॅटरी असलेले तुर्कीत उत्पादित रोबोटिक बचाव यंत्र खरेदी केले जाणार होते.
मात्र, भारत-पाक संघर्षात पाकला तुर्कीकडून मदत करण्यात आली होती. यामुळे हे भाजप आणि उद्धवसेनेने या कंत्राटाला विरोध दर्शवला. अखेर या प्रकल्पासाठी देण्यात आलेले कंत्राट रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.
असे होते रोबोटिक बचाव यंत्र…
रिमोट कंट्रोलने हाताळणी. रोबोटची वहनक्षमता २०० किलोग्रॅमपर्यंत.
समुद्रात प्रतितास १८ किमी वेगाने हा रोबोट पोहोचू शकतो.
साधारण ८०० मीटर आणि त्याही पेक्षा जास्त लांब रोबोट जाऊ शकतो.
हा रोबोट एक तास कार्यरत राहू शकतो व त्याला पुन्हा चार्ज करता येते.





