Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पुन्हा एकदा चर्चेत! गाडीवर लावलेल्या लाल-निळ्या दिव्यांमुळे वाद; उबाठाचे आमदार म्हणाले…
Ritu Tawde : मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.

Ritu Tawde : मुंबई महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून, या व्हिडिओत महापौर रितू तावडे यांच्या गाडीवर लाल-निळे फ्लॅश दिवे बसवण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. दिवसा देखील पोलिसांच्या वाहनांप्रमाणे हे दिवे लावले जात असल्याचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन होत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी एक्सवरुन ट्वीट करत नवनिर्वाचित महापौरांच्या विरोधात नक्की काय चाललंय? सवाल उपस्थित केला आहे.
मुंबई महानगरपालिकेत अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता होती. जवळपास 25 ते 30 वर्षांनंतर आता भाजप सत्तेत आल्याने राजकीय वातावरणही तापले आहे. अशा परिस्थितीत भाजप सत्तेत आल्यानंतरही व्हीआयपी संस्कृती पुन्हा डोके वर काढत असल्याची टीका होत आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या महापौरांच्या अधिकृत गाडीवरील लाल दिवे दोन दिवसांपूर्वीच काढण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे सध्या महापौरांच्या गाडीवर कोणतेही विशेष दिवे नसल्याचे सांगण्यात येत आहे.
लाल निळे दिवे लावल्याचा दावा
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत महापौरांच्या नव्या इनोव्हा गाडीवर छतावर दिवे नसले तरी समोरच्या भागात (फ्रंट ग्रिल किंवा बंपरजवळ) लाल आणि निळे फ्लॅशिंग दिवे बसवलेले दिसत आहेत. तसेच त्यांच्या ताफ्यातील एक स्कॉर्पिओ गाडीवरही पोलिस वाहनांसारखे लाल-निळे दिवे लावलेले आहेत. असा दावा करण्यात आला आहे.
नियम काय सांगतो?
केंद्र सरकारच्या 1 मे 2017 च्या अधिसूचनेनुसार, फक्त अग्निशमन, पोलीस, संरक्षण दल, अर्धसैनिक दल आणि आपत्ती व्यवस्थापन सेवांच्या वाहनांनाच विशेष परिस्थितीत रंगीत दिवे (लाल, निळा, पांढरा इ.) वापरण्याची परवानगी आहे.
महागड्या घड्याळामुळे चर्चेत
मुंबईच्या महापौर रितू तावडे याअगोदर हातावरील मनगटावर घातलेल्या महागड्या घड्याळामुळे चर्चेत आल्या होत्या. घड्याळाचे मॉडेल ‘Rolex Daytona येलो गोल्ड डेटोना’ असल्याचे सांगत त्याची किंमत 60 ते 70 लाख रुपये असल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर रितू तावडे यांनी याबाबत स्पष्टीकरण देत व्हायरल होत असलेली माहिती पूर्णपणे खोटी आणि दिशाभूल करणारी आहे. त्यांच्या हातातील घड्याळ हे ‘Michael Kors’ कंपनीचे असून ते ‘Rolex Daytona’ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.





