Ashwini Bhide : मुंबई महापालिकेच्या नव्या आयुक्तपदी मुख्यमंत्र्यांच्या अप्पर मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची निवड करण्यात आली आहे. अश्विनी भिडे या मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक देखील आहेत. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेच्या त्या पहिल्या महिला आयुक्त असणार आहेत. मंगळवारी आपल्या पदाचा त्या कार्यभार स्वीकारणार आहेत. पालिका आयुक्त भूषण गगराणी मंगळवारी सेवानिवृत्त होत आहेत. आयुक्तपदासाठी अश्विनी भिडे, अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. मिलिंद म्हैसकर, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांची नावे चर्चेत होती.पण भिडे यांचे नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. अश्विनी भिडे या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विश्वासातील मानल्या जातात. Mumbai BMC Commissioner मुंबई महापालिकेत महिलाराज महापालिकेत प्रथमच भाजपची सत्ता आली असून मुंबईकरांना दिलासा देणार्या अनेक योजनांची मुख्यमंत्र्यांनी आखणी केली आहे. या योजना मार्गी लावण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी आपल्या विश्वासू अधिकारी भिडे यांच्यावर सोपवली आहे. एकीकडे महापौर रितू तावडे तर दुसरीकडे आयुक्त भिडे असे महापालिकेत महिलाराज आल्याची चर्चा होत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा निवासस्थानी सोमवारी सायंकाळी चर्चा झाली आणि अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अश्विनी भिडे यांचा अल्पपरिचय अश्विनी भिडे या भारतीय प्रशासकीय सेवेतील १९९५ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. त्यांची मुंबईला ‘मेट्रो वूमन’ अशी देखील ओळख आहे. मुंबईत मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या उभारणीत व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तपदही त्यांनी भूषविले आहे. शालेय शिक्षण विभागाच्या सचिव, एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. Ashwini Bhide हेही वाचा: Smart Toilet : ‘स्मार्ट टॉयलेट’चा फुगा फुटणार? योजनेच्या घोषणेनंतर तक्रारींचा महापूर; नगरसेवकांची लागली रांग