Mumbai Local Accident : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री पावणे आठच्या सुमारास दोन जण धावत्या लोकलमधून पडल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर लोकलमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. राज्यासह मुंबई शहरात धुळवडीचा उत्साह पाहायला मिळाला. विविध भागांत राजकीय पक्षांसह नागरिकांनी धुळवड साजरी केली. अनेक रहिवासी परिसरातही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर उत्साहात साजरा झालेला सण शांततेत पार पडला; मात्र त्यानंतर ही दुर्घटना घडल्याने परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं. खार रोड रेल्वे स्टेशन जवळ ही घटना घडली. लोकलमधून प्रवास करत असताना दोघे जण अचानक खाली पडल्याची प्राथमिक माहिती आहे. संबंधित दोघेही दारूच्या नशेत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच जीआरपी घटनास्थळी दाखल झाले. प्रवाशांनी तातडीने रेल्वे पोलिसांना कळवले होते. जखमींची ओळख आणि प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेमुळे काही काळ स्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील तपास रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे.