मुंबई : मुंब्रा स्थानकाजवळ घडलेल्या दुर्घटनेवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. मुंबईतील रेल्वे नेटवर्क सुरक्षित नसल्याचा आरोप करत काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यासंदर्भात वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ही अतिशय धक्कादायक आणि दु:खद घटना आहे. गर्दीमुळे रेल्वेतून चार प्रवासी खाली पडून मृत्यूमुखी पडले, पण हे पूर्णपणे टाळता येण्यासारखं होते. मुंबईतील रेल्वे नेटवर्क, मग ते उपनगरी असो वा लांबपल्ल्याच्या गाड्या असो, अजूनही सुरक्षित नसल्याचे या दुर्घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. वाढती गर्दी, व्यवस्थापनातील निष्काळजीपणा आणि अपु-या सोयीसुविधा यामुळे दररोज हजारो प्रवाशांचे प्राण धोक्यात येतात. हे प्रश्न आम्ही अनेकदा संसदेतही उपस्थित केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रेल्वेला आता सोशल मीडियावरच्या रील्स नव्हे, तर रिअल कामाची गरज आहे. अनेक दुर्घटनांनंतरही जबाबदारी घेण्याची तयारी सरकारमध्ये नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे सांगतानाच, या अपघाताच्या सखोल चौकशीसह मृतांच्या कुटुंबीयांना योग्य नुकसानभरपाई, जखमींना संपूर्ण उपचार आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासोबतच, या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वेमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणीही त्यांनी केली.