मुंबई-कोकण प्रवास आता फक्त 5 तासात; रो-रो सेवेची सुरूवात, प्रवाशांना होणार फायदा

Kokan M2M Ro Ro Seva | कोकणात आता बोटीने जाता येणार आहे. सागरी रो-रो बोट सेवेची चाचणी यशस्वीरित्या करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेली मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू झाली आहे. सुरुवातीला ही सेवा गणेश चतुर्थीच्या दोन-तीन दिवस आधी सुरू करण्याचे नियोजन होते, मात्र तांत्रिक कारणांमुळे ते शक्य झाले नाही.
मत्स्यव्यवसाय बंदर मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ही सेवा सुरू झाली आहे. मुंबई ते कोकण समुद्रामार्गे प्रवास करण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली, ज्यामुळे कोकणवासियांना आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबईवरून निघालेली एम 2 एम प्रिन्सेस ही बोट जयगड बंदरात दुपारी 2 वाजता दाखल झाली. त्यानंतर ती विजयदुर्गकडे रवाना झाली. त्यामुळे लवकरच मुंबई ते रत्नागिरी, मुंबई ते सिंधुदुर्ग अशी बोटसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. . रस्त्याने १०-१२ तास लागणाऱ्या प्रवासाऐवजी हा पर्याय अल्पावधीत पूर्ण होऊन प्रवाशांचा वेळ वाचवणार आहे. २५ नॉट्स स्पीडच्या ‘एम टू एम’ नावाच्या रो-रो बोटीने नागरिकांना सेवा दिली जाणार आहे.
मुंबई ते रत्नागिरी प्रवास तीन तासांत तर मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास पाच तासांत करण्यासाठी मुंबई ते विजयदुर्ग, सिंधुदुर्ग अशी सागरी रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय सागरी मंडळाने घेतला होता. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकासमंत्र्यांनी तशी घोषणाही विधिमंडळात केली होती. मात्र, विजयदुर्ग येथे रो-रो सेवेसाठी जेट्टी बांधण्यासाठी वेळ लागल्याने ही सेवा गणेशोत्सवापूर्वी सुरू झाली नाही.
या फेरी सेवेसाठी भाडेप्रणाली
- प्रवाशांसाठी तिकीट २,५०० रुपये (इकॉनॉमी क्लास) पासून ९,००० रुपये पर्यंत असेल.
- वाहनांसाठीही स्वतंत्र भाडे ठेवण्यात आले आहे.
- कारसाठी ६,००० रुपये, दुचाकीसाठी १,००० रुपये आणि सायकलसाठी ६०० रुपये भाडे आकारले जाईल. या सुविधेमुळे प्रवाशांना आपली वाहने सोबत नेण्याची सोय मिळणार आहे.
- रो रो फेरीमध्ये एकाच वेळी ५० चारचाकी, ३० दुचाकी आणि मिनी-बस वाहून नेण्याची क्षमता आहे.
- या फेरीमध्ये एकावेळी ६५६ प्रवासी नेता येणार आहेत.
याबाबत नितेश राणे म्हणाले, “परतीच्या प्रवासात बोटीने चाकरमान्यांना थेट मुंबई गाठण्याचा मार्ग मोकळा होईल. आज विजयदुर्ग बंदरात बोटीची पहिली यशस्वी चाचणी पूर्ण झाली आहे. हवामान अनुकूल राहिल्यास आणि सर्व यंत्रणांची पडताळणी समाधानकारक झाल्यास ही सेवा कायमस्वरूपी सुरू करण्यात येईल.”
हेही वाचा:




