Mumbai Hoarding Case: घाटकोपर होर्डिंग प्रकरणी 4 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

Mumbai Hoarding Case – घाटकोपर येथील पंत नगरमध्ये असलेल्या पेट्रोल पंपवर 13 मे 2024 ला एक महाकाय होर्डिंग वादळामुळे कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला होता, तर 84 जण जखमी झाले होते.
जीआरपीच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे हे होर्डिंग लावण्यात आल्याचे समोर आले होते. याप्रकरणी आता अटकेत असलेल्या चारही आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
मुंबईतील घाटकोपर परिसरात झालेल्या होर्डिंग दुर्घटनेला आज दोन महिने पूर्ण झाले आहेत. गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) शनिवारी न्यायालयात 3,299 पानांचे आरोपपत्र दाखल केले. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींविरुद्ध आरोपपत्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपपत्रानुसार, सरकारी रेल्वे पोलीस आणि बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांची भूमिका शोधण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिताच्या कलम 173 (8) अन्वये तपास सुरू राहील. आरोपपत्रात बीएमसीचे दोन अधिकारी आणि सहा अधिकाऱ्यांच्या जबाबांचाही समावेश आहे.





