Satara News : महाबळेश्वरातील व्यक्तीला मुंबई गुन्हे शाखेकडून अटक; धमकी प्रकरणात पाकिस्तान अन् ‘लष्कर-ए-तोयबा’ कनेक्शन समोर
Satara News : मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर पथकाने (CIU) महाबळेश्वर तालुक्यातील मोहम्मद शफीक मोहम्मद अकबर लोन (वय ३९) याला शनिवारी अटक केली आहे.

Satara News : मुंबईतील वांद्रे (पूर्व) परिसरातील अनधिकृत मशिदीच्या पाडकामाला पाठिंबा दिल्याच्या कारणावरून व्यावसायिकाला आलेल्या धमकीच्या प्रकरणाचा तपास करताना महाबळेश्वर तालुक्यातील एका व्यक्तीचा पाकिस्तानमधील व्यक्तींशी संपर्क असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर पथकाने मोहम्मद शफीक मोहम्मद अकबर लोन (वय ३९, रा. महाबळेश्वर) याला शनिवारी अटक केली. (Satara News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील अनधिकृत मशिदीच्या पाडकामाच्या कारवाईला व्यावसायिक इम्तियाज खत्री यांनी पाठिंबा दर्शविल्यानंतर त्यांना २१ मेपासून आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून धमकीचे दूरध्वनी व संदेश येत होते. (Satara News)
याबाबत २२ जून रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या तपासादरम्यान लोन याचे नाव समोर आले. तपासात लोनच्या कुटुंबातील काही सदस्य पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. (Satara News)
त्याचा एक भाऊ २०१९ मध्ये पाकिस्तानात गेल्याचे आणि तो प्रतिबंधित ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. या पार्श्वभूमीवर लोनच्या संपर्कांची आणि त्याच्या भूमिकेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. (Satara News)
पोलिसांच्या तपासात लोनचा ‘फैयाज काश्मिरी’ नावाच्या पाकिस्तानी व्यक्तीशी समाजमाध्यमातून संपर्क असल्याचेही निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर काही संशयास्पद आर्थिक व्यवहारांची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी लोनकडून दोन मोबाइल फोन आणि एक डायरी जप्त केली आहे. ()Satara News
मोबाइलमधून हटविण्यात आलेला मजकूर व अन्य डिजिटल माहिती मिळविण्यासाठी तांत्रिक तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. या माहितीच्या आधारे धमकी प्रकरणातील संपर्क, व्यवहार आणि इतर व्यक्तींचा सहभाग याबाबत तपास केला जाणार आहे. लोनचा धमकी प्रकरणाशी नेमका संबंध काय आहे, याचाही तपास सुरू आहे. (Satara News)
पाचगणी पोलीस इन ॲक्शन
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोहम्मद शफीक मोहम्मद अकबर लोन याला अटक करण्यात आली आहे. त्याचे पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील ‘लष्कर-ए-तोयबा’शी संबंध असल्याची माहिती तपासातून समोर आली असून, पुढील चौकशीसाठी मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे.
– सुनील साळुंखे (पोलीस उपअधीक्षक, वाई विभाग)





