Vijay Hazare Trophy : शार्दूल-मुलाणीच्या भेदक गोलंदाजीने मुंबईने साधली विजयाची हॅट्ट्रिक! छत्तीसगडचा उडवला धुव्वा

Mumbai beat Chhattisgarh in Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबईच्या संघाने आपला दबदबा कायम राखत विजयाची ‘हॅटट्रिक’ साजरी केली आहे. कर्णधार शार्दुल ठाकूरची भेदक वेगवान गोलंदाजी आणि फिरकीपटू शम्स मुलाणीचा ‘पंच’ यांच्या जोरावर मुंबईने छत्तीसगडचा ९ गडी राखून दणदणीत पराभव केला. या सलग तिसऱ्या विजयामुळे ‘गट क’ मध्ये मुंबईने आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले आहे.
छत्तीसगडचा डाव कोसळला –
जयपूरच्या जयपुरिया विद्यालय मैदानावर झालेल्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सकाळी खेळपट्टीवर असलेला ओलावा आणि हवेतील थंडीचा फायदा शार्दुलने अचूक उचलला. त्याने आपल्या धारदार गोलंदाजीने पहिल्या ५ षटकांतच छत्तीसगडची अवस्था ४ बाद १० अशी दयनीय केली. शार्दुलने केवळ १३ धावांच्या मोबदल्यात ४ महत्त्वाचे विकेट्स टिपले.
Mumbai’s captain Shardul Thakur delivered an outstanding performance with figures of 4/13 against Chhattisgarh.#VijayHazareTrophy #ShardulThakur pic.twitter.com/zIIEVGRw3N
— MrFantus (@Mrfantus09) December 29, 2025
सुरुवातीच्या पडझडीनंतर अमनदीप खरे (६३) आणि अजय मंडल (४६) यांनी १०५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून छत्तीसगडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, डावखुरा फिरकीपटू शम्स मुलाणीने ही जोडी फोडत मुंबईला पुनरागमन करून दिले. मुलाणीने आपल्या फिरकीच्या जाळ्यात छत्तीसगडच्या खालच्या फळीला अडकवत ३१ धावांत ५ विकेट्स मिळवले. परिणामी, छत्तीसगडचा संपूर्ण संघ ३८.१ षटकांत १४२ धावांवर गारद झाला.
हेही वाचा – Kristen Beams : मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय; ऑस्ट्रेलियाच्या माजी फिरकीपटूवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी
अंगकृष-सिद्धेशची अभेद्य भागीदारी –
१४३ धावांचे माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईने अवघ्या २४ षटकांत १ गडी गमावून विजय संपादन केला. दुखापतीतून सावरून पुनरागमन करणाऱ्या युवा अंगकृष रघुवंशीने नाबाद ६८ धावांची खेळी करत सर्वांची मने जिंकली. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि २ उत्तुंग षटकार लगावले. त्याला अनुभवी फलंदाज सिद्धेश लाडने (नाबाद ४८) मोलाची साथ दिली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची नाबाद भागीदारी करून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.





