Mulshi News: सरपंचच बसले उपोषणाला! पौड ग्रामपंचायतीच्या ‘त्या’ जुन्या कामांची चौकशी होणार

प्रभात वृत्तसेवा
पौड – ग्रामपंचायत पौड येथील विकासकामांतील कथित भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी होऊनही दोषींवर कारवाई न झाल्याने पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसलेले पौडचे सरपंच किरणकुमार आगनेन यांनी गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आपले आंदोलन स्थगित केले.
पौड ग्रामपंचायतीत तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी माधुरी झेंडे व तत्कालीन सरपंच प्रशांत वाल्हेकर यांच्या कार्यकाळात काही विकासकामांमध्ये अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सध्याचे सरपंच किरणकुमार आगनेन यांनी केला होता.यासंदर्भात त्यांनी मुळशी पंचायत समितीकडे विकासकामे व खर्च केलेल्या निधीची सखोल चौकशी करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली होती.
त्यानंतर विस्तार अधिकारी एम. पी. चव्हाण यांच्या मार्फत ग्रामपंचायतीच्या दप्तराची तसेच संबंधित विकासकामांची तपासणी करण्यात आली. या चौकशीत काही कामांमध्ये नियमबाह्य बाबी आढळून आल्याचे स्पष्ट झाले असून, नियमानुसार कायदेशीर कार्यवाही करावी, असा अहवाल विस्तार अधिकारी एम. पी. चव्हाण यांनी गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांना सादर केला होता.
मात्र अहवाल सादर होऊनही अनेक दिवस उलटून गेल्यानंतर पंचायत समिती विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने सरपंच किरणकुमार आगनेन यांनी शुक्रवार (दि. 2) रोजी सकाळपासून पंचायत समितीच्या प्रवेशद्वारासमोरच आंदोलन सुरू केले होते.
दरम्यान, दुपारी गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन संबंधित प्रकरणावर पुढील काही दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर सरपंचांनी आपले आंदोलन मागे घेतले.यावेळी उपसरपंच आशा जाधव, माजी उपसरपंच प्रीती आगनेन, मोनाली ढोरे तसेच पौड गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“नियमानुसार संबंधित ग्रामपंचायत अधिकारी व तत्कालीन सरपंच यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. 9 जानेवारीपर्यंत त्यांनी आपले म्हणणे सादर न केल्यास त्यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”
– सुधीर भागवत, गटविकास अधिकारी, मुळशी





